नांदेड : गेल्या आर्थिक वर्षअखेर अनेक वर्षांपासूनचा संचित तोटा भरून काढत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अनेक वर्षांनंतर प्रथमच नफ्यामध्ये आली आहे. पण जिल्ह्यातील पाच साखर कारखानदारांकडील सुमारे २०० कोटी रुपयांचे कर्ज अद्यापही थकीत असून ‘टॉप ट्वेन्टी’ थकबाकीदारांत त्यांचे नाव कायम आहे.

बँकेच्या नुकत्याच झालेल्या ९८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यकाळातील ठळक बाबी उपस्थित सभासदांसमोर जोरकसपणे मांडण्यात आल्या. मार्च-२०२५ अखेर बँक संचित तोट्यातून मुक्त झाली. बँकेला १५ लाखांचा निव्वळ नफा झाला असून एनपीएचे प्रमाण १५ टक्क्यांच्या आत आले आहे. आता ही बँक सार्वजनिक, खासगी आणि बड्या नागरी सहकारी बँकांच्या धर्तीवर खातेदारांना आधुनिक सेवा देण्यास सज्ज झाल्याचे सभेमध्ये अध्यक्ष भास्करराव खतगावकर यांनी जाहीर केले.

वरील सभेमध्येच बँकेचा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला. त्यावरून ही बँक काही लाखांच्या नव्हे, तर आज कोट्यवधींच्या नफ्यामध्ये राहिली असती; पण काही कारखान्यांकडील थकबाकीच्या वसुलीत संचालक मंडळ आणि प्रशासनाला यश आले नाही, हे वरील अहवालातून समोर आले.

बँकेच्या ‘टॉप’ थकबाकीदारांमध्ये गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याचे नाव (थकीत रक्कम ७१.४५ कोटी) असल्याचे दिसून आले. हा कारखाना अनेक वर्षांपूर्वी अवसायनात निघाला. बँकेने या कारखान्याची सर्व मालमत्ता आपल्या ताब्यात घेतली असली, तरी थकीत कर्जाच्या वसुलीतील त्रांगडे दूर झालेले नाही. ‘जय अंबिका’ कारखान्याकडील थकबाकी ५९ कोटींवर गेली असून मागील काळात या कारखान्याला विनातारण कर्ज देण्यात आले होते. मधल्या काळात हा कारखाना एका खासगी कंपनीने विकत घेतला. बँकेने आता खासगी कंपनीकडून रक्कम वसूल करण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी स्थापन केलेल्या जयवंतराव पाटील कारखान्याकडेही ५३.६९ कोटींची थकबाकी असून या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेतर्फे न्यायालयीन प्रक्रिया सुरू असली, तरी त्यात लक्षणीय प्रगती झालेली नाही. दिवाणी न्यायालयाच्या स्तरावर कायदेशीर बाबी प्रलंबित आहेत.

कलंबर कारखान्याच्या मालमत्तेच्या विक्रीतून बँकेस मागील आर्थिक वर्षात सुमारे २२ कोटी रुपये मिळाले. पण या कारखान्याकडे अद्यापही १० कोटी रुपये बाकी आहेत. जय शिवशंकर कारखान्याकडील थकबाकीबद्दल बँकेचे ७ कोटी ५२ लाख रुपये वसूल झाले होते; पण या कारखान्याकडेही पावणेचार कोटी रुपयांची बाकी आहे. सर्व साखर कारखान्यांकडील थकबाकीचा आकडा २०० कोटींपर्यंत गेला आहे.

खासदार अशोक चव्हाण सभेस गैरहजर

बँकेच्या वार्षिक सभेच्या दिवशी खासदार अशोक चव्हाण नांदेडमध्ये आलेले होते. पण दरवर्षीच्या प्रघातानुसार त्यांनी बँकेच्या वार्षिक सभेकडे पाठ फिरवली. बँकेमध्ये मागील पाच वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ सत्तेमध्ये आहे; पण या काळातील एकाही वार्षिक सभेस सभासद या नात्याने चव्हाण उपस्थित राहिले नाहीत. यंदाच्या सभेला रजा न पाठवता गैरहजर राहिलेल्या सर्वच सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करण्यात आली.