नांदेड : मुखेड तालुक्याच्या काही भागांत रविवारी रात्री तुफान पाऊस झाल्यानंतर वेगवेगळ्या गावांमध्ये सोमवारी सकाळपासून आपत्ती निवारण पथक व महसूल यंत्रणेकडून मदतकार्य सुरू झाले. या अतिवृष्टीत लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील ९ गावांना जबर तडाखा बसल्यानंतर अलीकडे या धरणावर सुरू झालेल्या घळभरणीच्या कामामुळे आपत्ती ओढविली आणि प्रचंड हानी झाली असल्याचे त्या भागातील कार्यकर्ते राजीव पाटील रावणगावकर यांनी सांगितले.

शासन दप्तरी वरील गावांचे पुनर्वसन झाल्याची नोंद असली, तरी गेल्या मे महिन्यात धरणावरील घळभरणीचे काम सुरू होण्यापूर्वी प्रकल्पग्रस्तांनी त्यास हरकत घेतली होती. अनेक कुटुंबांना पुनर्वसनाच्या ठिकाणी घरे बांधता आली नाहीत. त्यांनी संबंधित यंत्रणेकडे मुदत मागितली होती. संबंधित गावांतील लोकांचे स्थलांतर झाल्याशिवाय घळभरणीचे काम सुरू करू नका, अशी विनंती तेव्हा करण्यात आली. पण प्रशासनाने आम्हाला दाद दिली नाही, असा आरोप रावणगावकर यांनी केला. एकंदर घटना नैसर्गिक आपत्तीची असली, तरी प्रशासकीय असंवेदनशीलतेमुळे वरील गावांतील अनेक कुटुंबांना अतिवृष्टी तसेच गावांमध्ये शिरलेल्या पाण्याचा तडाखा बसल्याचे सांगितले जात आहे.

मुखेड येथून मिळालेल्या माहितीनुसार या तालुक्यातील रावणगाव, दोन्ही भाटापूर, भासवाडी, हसनाळ, भेंडेगाव, रावी, भिंगोली, कोळनूर इत्यादी गावे रविवार-सोमवारदरम्यानच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर बाधित झाली. लेंडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडके यांनी दिलेल्या माहितीनुसार अवघ्या ५-६ तासांत सुमारे सव्वादोनशे मि.मी. पाऊस झाला. तसेच लातूर, उद्गीर आणि कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे लेंडी नदीच्या पाणी पातळीत ८ मीटरने वाढ झाल्यामुळे वरील गावांमध्ये पाणी शिरले. घळभरणीचे काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक त्या पूर्वसूचना देण्यात आल्या होत्या, असे तिडके यांनी स्पष्ट केले असले, तरी राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरील घाईगडबडीमुळे लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रांतील गावांना मोठा तडाखा बसल्याचे दिसून आले.

रविवारच्या मध्यरात्रीनंतर मुखेड तालुक्याच्या काही भागात अचानक ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानंतर वेगवेगळ्या गावांमध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची माहिती सोमवारी सकाळी जिल्हा मुख्यालयी प्राप्त होताच वेगवेगळ्या विभागांच्या यंत्रणा सक्रिय झाल्या. मुखेड मतदारसंघाचे आमदार डॉ.तुषार राठोड रविवारी मुंबईकडे रवाना झाले होते. आपल्या मतदारसंघातील परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तहसीलदार व इतर अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. नांदेडचे खासदार प्रा.रवींद्र चव्हाण सोमवारी सकाळीच मुखेड तालुक्यातील पूर परिस्थिती आणि आपत्तीची पाहणी करण्यासाठी रवाना झाल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ जिल्ह्यातील एका कार्यक्रमाला जाण्यासाठी सोमवारी दुपारी नांदेडला येणार होते. पण त्यांचा दौरा रद्द झाल्याचा निरोप सकाळीच प्राप्त झाला. मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्यामुळे जिल्हाधिकारी व अन्य संबंधित अधिकार्‍यांना मुखेड तालुक्यातील परिस्थिती आणि मदत कार्याकडे लक्ष केंद्रीत करता आले.

दरवाजा निघाला म्हणून कुटुबीय वाचले

घरात पाणी आले, बघता बघता टोंगळ्यापर्यंत आले.. हातात तीन महिन्याचे बाळ (नातू) घेऊन काही वस्तू, पैसे ठेवलेले शोधावे म्हटले तर पाणी कमरेपर्यंत आले. घराच्या पुढे पाणी खूप असल्याने मागचा दरवाजा तोडेपर्यत पाणी डोक्यापर्यंत आले… दरवाजा निघाला म्हणून आम्ही कुटुंबिय वाचलो… बाळाला डोक्यावर घेऊन माळावर पोहोचलो… धो पाऊस आणि पुढे मरण या परिस्थितीत रात्र काढली. चार म्हशी मरण पावल्या… धरण करण्याच्या अगोदर आमचे पुनर्वसन का केले नाही? मरणाच्या दारात सोडणाऱ्या सरकारकडून आता कोणत्या अपेक्षा?