नांदेड : भारतीय जनता पक्षाच्या दोन स्थानिक राज्यसभा सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली २०व्या समरसता साहित्य संमेलनाची येथील श्री गुरुगोविंदसिंघजी साहित्य नगरीमध्ये जोरदार तयारी सुरू असतानाच साहित्य क्षेत्रांत पुरोगामी विचारवंत दिवंगत नरहर कुरुंदकर यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नांदेडमध्ये संमेलनाच्या पूर्वसंध्येलाच संमेलनविरोधी सूर निघाला असून संविधानवादी आणि समतावाद्यांनी संमेलनावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

१९९८ सालापासून महाराष्ट्र समरसता साहित्य परिषदेतर्फे समरसता साहित्य संमेलनाचा उपक्रम सुरू झाला. २०२५च्या २०व्या साहित्य संमेलनासाठी नांदेडची निवड करण्यात आल्यानंतर स्थानिक पातळीवरील आयोजक संस्था आणि त्यातील कार्यकर्त्यांनी आयोजनात पुढाकार घेतला. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली भरणार्‍या या संमेलनाचे उद्घाटन भदंत डॉ.राहुल बोधी महाथेरो यांच्या हस्ते शनिवारी सकाळी होणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. खासदार अजित गोपछडे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मार्गदर्शक करण्यात आलेले आहे.

दरम्यान या संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आलेले राज्याच्या वेगवेगळ्या भागातील साहित्यिक, वक्ते आणि कवी नांदेडमध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेली असतानाच प्रगतिशील लेखक संघ आणि इतर पुरोगामी संघटनांचे स्थानिक पदाधिकारी तसेच काही लेखक कवींनी समरसता साहित्य संमेलनाविरुद्ध एक पत्रक जारी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समरसता ही भ्रामक कल्पना असल्याचे त्यात म्हटले आहे. संविधान आणि समतावाद्यांनी या संमेलनावर बहिष्कार घालावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकावर डॉ.संतोष हंकारे, डॉ.गजानन देवकर, डॉ.गजानन इंगोले पाटील, डॉ.सचिन खडके, डॉ.प्रकाश मोगले, लेखक श्रीकांत देशमुख, प्रा.श्रीराम गव्हाणे, डॉ.अनंत राऊत, प्रा.दिलीप चव्हाण, कॉ.प्रदीप नागापूरकर, कॉ.उज्ज्वला पडलवार, डॉ.पंजाब शेरे, फारुक अहमद आदींची नावे आहेत.

संमेलनाच्या विरोधात अत्यंत कडक भाषेतील पत्रक निघाले, तरी शुक्रवारी दुपारपर्यंत स्वागताध्यक्ष किंवा संमेलनाच्या प्रमुख आयोजकांकडून त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही. काही मुद्रित माध्यमांनी संयोजकांकडे संमेलनाध्यक्षांच्या छापील भाषणाची प्रत मागितली होती. पण आयोजक संस्थेने संमेलनाध्यक्षांचे भाषण संमेलनाच्या उद्घाटन सत्रात देण्याची भूमिका घेतली.