नांदेड : मृग जवळपास कोरडा गेला असून, रविवारी सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करत असून, या नक्षत्राकडून मोठ्या अपेक्षा आहेत. गोदावरीच्या लाभक्षेत्रात मे आणि जूनमध्ये आजवर जो पाऊस झाला, त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाच्या जलसाठ्यात किरकोळ वाढ झाली असून, सध्या २३.६८ टक्के साठा आहे. अन्य सर्व जलसाठ्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे.
या वर्षी मे महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. मान्सूनपूर्व पावसाने अपेक्षेबरोबर भीतीही वाढवली होती. पण, आता भीती खरी ठरली आहे. वास्तविक नांदेड जिल्ह्यात जुलैच्या मध्यानंतरच खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात होते. गतवर्षीसुद्धा १९ जुलैनंतर पावसाने जोर पकडला. तो ऑक्टोबरपर्यंत कायम होता. सर्व जलाशय पूर्ण भरले होते. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची फारशी टंचाई जाणवली नाही.
या पावसाळ्यात मान्सूनचे आगमन तुलनेने लवकर झाले. परंतु नंतर त्याच्या प्रवासात अनेक अडथळे आले. आता जून अंतिम टप्प्यात आहे. मृग नक्षत्र संपत आले. रविवारी आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ होतो आहे. उंदीर वाहन असलेल्या या नक्षत्राकडून मोठ्या अपेक्षा आहेत. विशेषतः सर्व जलाशयांतील साठ्यांमध्ये वाढ होणे नितांत गरजेचे आहे. मोठ्या व मध्यम प्रकल्पातील जलसाठे चिंताजनक स्थितीत आहेत.
पेरणीसुद्धा खोळंबली असून, २५ टक्केसुद्धा पेरणी झालेली नाही. आषाढी वारीनिमित्त दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. परंतु बळीराजाचा जीव टांगणीला लागला आहे. काही ठिकाणी पाणी उपलब्ध असले, तरी विजेअभावी ते देता येत नसल्याने पेरणी संकटात सापडली आहे. तर, बहुतांश भागात पेरणीची हिंमत शेतकरी करू शकलेला नाही. प्रशासनाच्या वतीने ‘वाट पाहा’चा संदेश वारंवार दिला जात असल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
गतवर्षी जूनच्या २० तारखेपर्यंत ७८.४० मिलिमीटर अर्थात अपेक्षित सरासरीच्या ७५.६८ टक्के पाऊस झाला होता. यंदा त्यापेक्षाही कमी पावसाची नोंद झाली आहे. आजवर केवळ ६९ मिलिमीटर म्हणजे ६६.६० टक्के पाऊस पडला. किमान १०० मिलिमीटर पाऊस सर्वदूर पडल्याशिवाय पेरणी करणे धोकादायक असल्याचे मानले जाते. यंदा केवळ लोहा तालुक्यात ११८ मिमी पाऊस झाला आहे. अन्य तालुक्यांत ९० मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद आहे.
जलाशयांतील सद्य:स्थितीची टक्केवारी
- १) विष्णुपुरी प्रकल्प – २३.६८
- २) अपर मानार (लिंबोटी) – २६.५६
- ३) लोअर मानार (बारुळ) – ५०.६३
- ४) इसापूर (जि. वाशिम) – ४३.२०
जिल्ह्यात एकूण ९ मध्यम प्रकल्प असून, त्यांपैकी ३ जलाशयांत ७५ टक्क्यांपेक्षा कमी, दोनमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी, तर ४ जलाशयांत २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. ९ उच्च पातळी बंधाऱ्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. ८० लघु प्रकल्पांपैकी केवळ १ शंभर टक्के भरला आहे.