नांदेड : पुणे ही व्यावसायिक कर्मभूमी आणि मग हळद बेण्याच्या विक्री व्यवसायातून नांदेडजवळच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जम बसविणारे उद्योजक नरेन्द्र भगवानराव चव्हाण उसाच्या मळ्यात गेल्यानंतर त्यांच्या गळ्यात या कारखान्याच्या अध्यक्षपदाची माळ घालण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील एकमेव साखरनिर्मिती उद्योग अशी ओळख सांगणाऱ्या या कारखान्यामध्ये आधी मोहनराव पाटील मुदखेडकर आणि त्यांच्यानंतर गणपतभाऊ तिडके या ग्रामीण आणि कृषी पार्श्वभूमीच्या मातीतील कार्यकर्त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या घराण्यातील एक ‘उद्योगी’ व्यक्ती प्रथमच अध्यक्षपदी विराजमान झाली आहे.

खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वासह त्यांच्या संपूर्ण नियंत्रणाखाली चालणारा हा कारखाना प्रचंड कर्ज आणि तोट्यात चालला आहे. या कारखान्याचा सन २०२४-२५चा गाळप हंगाम सरल्यानंतर दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेल्या तिडके यांनी अलीकडे अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन दैनंदिन कटकटींतून आपली सुटका करून घेतली. नंतर संचालक मंडळाने त्यांचा राजीनामा मंजूर केला आणि शुक्रवारी त्यांच्या रिक्त जागी चव्हाण घराण्याचा झेंडा नरेन्द्र यांनी फडकविला.

अशोक चव्हाण यांच्या सौभाग्यवती काही काळ वरील कारखान्यात उपाध्यक्ष होत्या; पण तेव्हा एका प्रकरणात संचालक मंडळ अडचणीत येताच त्यांनी राजीनामा दिला. नंतर अलीकडे याच परिवारातील नरेन्द्र चव्हाण उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते. त्यांना अध्यक्षपदी बसवून खासदार चव्हाण यांनी कारखान्यातील एका सशक्त गटाला धक्का दिला.

‘भाऊराव चव्हाण’च्या नवीन अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया साखर सहसंचालक कार्यालयाचे अनुभवी अधिकारी विश्वास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या बैठकीत जेमतेम पाऊण तासात पूर्ण झाली. वरील पदासाठी केवळ चव्हाण यांचाच अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड देशमुख यांनी जाहीर केेली. नियोजित बैठकीचे आवश्यक ते सोपस्कार पूर्ण करून देशमुख कारखाना स्थळावरून नांदेडला आले. या दरम्यान खासदार अशोक चव्हाण कारखानास्थळी आल्यानंतर त्यांनी नवे अध्यक्ष या नात्याने आपल्या पुतण्याचे स्वागत आणि कौतुक केले. शंकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात राज्यातल्या अनेक साखरसम्राटांना अंगावर घेतले होते. आता नव्या काळात त्यांच्या थोरल्या बंधूंचा नातूच ‘साखरसम्राट’ झाला आहे.