Narendra Modi Subhash Desai : देशभरातून सातत्याने जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी होत आहे. अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेला मोठं आश्वासन दिलं आहे. “आपलं सरकार आणा, मी तुमची मागणी मान्य करतो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. वैजापूरमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी जनतेला जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं आश्वासन दिलं. ते म्हणाले, “केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितलं की, जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही. तुम्हाला काय वाटतं? मिंधे याबाबतची घोषणा करतील का? दिल्लीला विचारल्याशिवाय हे काही करू शकत नाहीत. जशीच्या तशी योजना लागू करण्याचा माझा शब्द आहे. मात्र शब्दाला ताकद देण्याची जबाबदारी तुमची आहे”.

दरम्यान, याच सभेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते व माजी आमदार सुभाष देसाई यांनी देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली. तसेच त्यांनी सांगितलं की, “पेन्शन केवळ निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांनाच मिळत नाही तर लोकप्रतिनिधिंना देखील पेन्शन मिळते. मला ८४ हजार रुपये पेन्शन मिळते. पंतप्रधान मोदी आज घरी बसले तर त्यांना किती रुपयांची पेन्शन मिळेल हे तुम्हाला माहितीय का?” यावेळी देसाई यांनी मोदींना किती रुपयांची मूलभूत पेन्शन, किती रुपयांचा भत्ता मिळणार याबाबतचा अंदाज व्यक्त केला.

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : “अन्यथा सरन्यायाधीशांनी गणपती बाप्पाला पुढची तारीख दिली असती”, ‘त्या’ भेटीवरून उद्धव ठाकरेंचा चिमटा

मला ८४ हजार रुपयांची पेन्शन मिळते : सुभाष देसाई

सुभाष देसाई म्हणाले, “केवळ सरकारी कर्मचाऱ्यांनाच पेन्शन मिळते असं नाही तर ती लोकप्रतिनिधींना देखील मिळते. मी २२ वर्षे आमदार होतो. १५ वर्षे विधानसभेत आणि सात वर्षे विधानपरिषदेत मी माझ्या पक्षाचं व जनतेचं प्रतिनिधित्व केलं आहे. सुरुवातीला आमच्या पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी आशीर्वाद देऊन मला विधानसभेवर पाठवलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील मला पुन्हा पुन्हा आमदार होण्याची संधी दिली. त्यामुळे मी जनतेची सेवा करू शकलो. या सेवेच्या बदल्यात मला पेन्शन चालू झाली. आज मला ८४ हजार रुपये पेन्शन मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज निवृत्ती घेऊन घरी बसले तर त्यांना किती रुपयांची पेन्शन मिळेल हे तुम्हाला माहिती आहे का?”

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : “मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न तेव्हाही नव्हतं, आताही..”; उद्धव ठाकरे स्पर्धेतून बाहेर?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदींना किती रुपयांची पेन्शन मिळणार?

सुभाष देसाई म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जरी घरी बसले तरी त्यांना मोठी पेन्शन मिळेल. खरंतर देशातील जनतेने मे महिन्यातच त्यांना घरी बसवण्याची तयारी केली होती. परंतु, ते दोन कुबड्यांवर उभे राहिले. ते घरी बसले असते तर त्यांना ९० हजार रुपयांची पेन्शन मिळाली असती. कुठलाही नेता एकदा खासदार झाला तर त्याला २५ हजार रुपयांची पेन्शन लागू होते. दुसऱ्यांदा खासदार झाल्यावर त्यात अजून १० हजार रुपये वाढवले जातात. तिसऱ्यांदा खासदार झाल्यावर त्यात अजून १० हजार रुपयांची भर पडते. मोदी तीन वेळा खासदार झाले आहेत. म्हणजेच त्यांना ४५ हजार रुपयांची मूलभूत पेन्शन मिळेल. महागाई भत्ता म्हणून अधिक ४५ हजार रुपये त्यांना मिळतील. याचाच अर्थ ते आज घरी बसले तर त्यांना एकूण ९० हजार रुपयांची पेन्शन मिळेल”.