बीड : बीड जिल्ह्यात पावसाचा जोर थांबण्याचे नाव घेत नसून, रविवारी सकाळी ४८ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग दीड लाख क्युसेकपर्यंत वाढवण्याच्या संदर्भाने सूचना देण्यात आली होती. परिणामी जवळपास वाड्या-वस्त्या मिळून ६१ गावांना पुराने वेढण्याच्या भीतीने गेवराई, माजलगाव तालुक्यातील काही गावांतील नागरिकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. खबरदारी म्हणून मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक व लष्कराचे पथकही जिल्ह्यात दाखल झाले आहे. या सर्व परिस्थितीची माहिती जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे.

यापूर्वी पंधरा दिवसांपूर्वी आष्टीजवळील कडी नदीला व शिरूर कासार परिसरातील सिंदफणा नदीला पूर आला तेव्हा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक दाखल झाले होते. आता तिसऱ्यांदा या पथकाला पाचारण करावे लागले आहे. बिंदुसरा नदीलाही पूर आल्याने गावे प्रभावित झाली होती. आधीच पावसाने झालेल्या नुकसानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच जायकवाडीचे सर्व दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात केला जात असलेल्या विसर्गामुळे गेवराई, माजलगाव आणि परळी तालुक्यातील वाडी-वस्ती मिळून ६१ गावांमध्ये पुराचा धोका निर्माण झालेला आहे. गेवराईमधील सावळेश्वर, गुळज, नागझरी तर माजलगावातील कवडगाव थडी, रिधोरी, शेलगाव येथील सर्व नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू व पशुधनासह स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. सिंदफना नदीलाही पूर आल्याने दहापेक्षा अधिक गाव यांनी प्रभावित होण्याची भीती आहे.

जिल्ह्यामध्ये बीड, पाटोदा, आष्टी, गेवराई, वडवणी, शिरूर कासार या सहा तालुक्यांमधील ४८ महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले. आष्टीमधील दौलावडगाव मंडळात १२९ मिमी, धानोरा, दादेगाव मंडळात ११३, तर केजमधील हनुमंत मंडळात १०३ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली. यामुळे या भागातील शेतांना अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले होते.

वडवणीतील गावांचा संपर्क तुटला

वडवणी तालुक्यात काही गावांचा संपर्क तुटला आहे. तेथे आवश्यक ती मदत पुरविली जात आहे. आष्टीमधून ६० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. बचाव कार्यासाठी जिल्ह्यात एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराच्या पथकाची मदत घेतली जात आहे. या आधीच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन, ढालेगाव, तपोनिमगाव, सेललगावथडी, माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी, सादोळा, मंजरथ, देपेगाव, जायकोचीवाडी, बाभूळतारा, तर परळी तालुक्यातील पोहनेर, दिग्रस या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

अंत्यसंस्काराचे प्रश्न

बीड तालुक्यातील पिंपळादेवी गावात ७० वर्षीय जनाबाई सारंग बुबडे यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावात कुठेही जागा शिल्लक नसल्याने नातेवाईकांना शेजारी असलेल्या लिंबा रुई देवी गावातील स्मशानभूमीत जावे लागले.