कराड : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जळवखिंडी नजीकच्या मणदुरे (ता. पाटण) येथील उंच काऊदऱ्यावर गुरुवारी सकाळी निसर्गपूजेचा सोहळा संपन्न झाला. जेजुरीतील मार्तंड- जानाईदेवीच्या भक्तांनी वनसंपत्तीचे जतन व संवर्धन करा. तरच आपले जीवन सुखकारक होईल, हा संदेश देत सर्वत्र सुख- शांती नांदावी, यासाठी निसर्गाला जेजुरी खंडोबाचा भंडारा व जानाईदेवीचा गुलाल, नारळ अर्पण करून ही अनोखी निसर्गपुजा संपन्न केली.

सर्वत्र पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, बेसुमार वृक्षतोड, जंगलतोड, वणवे, कृत्रिम प्रदूषण यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. त्यातून अनेक भयानक संकटे उद्भवण्याची भीती आहे.  खेड्यातही होणारे सिमेंटचे जाळे आणि प्रदूषण, परंपरा, संस्कार जपणाऱ्या खेड्यांचे वाढते आधुनिकीकरण यामुळे शुद्ध हवा, स्वच्छ निर्मळ पाणी मिळणेही अवघड झाले आहे. या परिस्थितीला छेद देणारी ही अनोखी निसर्गपूजा निसर्ग, पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाची ठरते आहे. निसर्गप्रेमींना ही निसर्गयात्रा आकर्षित करीत आहे.

सातारा जिल्ह्यातील निसर्गप्रेमी आणि समस्त जेजुरीकर गावकऱ्यांनी आपली शेकडो वर्षांची धार्मिक यात्रा उत्सव पालखी सोहळ्याला पर्यावरण रक्षणाची जोड देवून जनजागृती करत वसुंधरा उत्सव साजरा करीत आली आहे. आपल्या धार्मिक परंपरा व श्रध्देनुसार भक्तांनी सह्याद्री पर्वत रांगांमधील उंच कड्यावरून निसर्गाला नारळ गुलाल- भंडारा अर्पण करुन निसर्गपूजा साजरी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेजुरीची ग्रामदैवता असलेल्या जानाईदेवीची पायी पालखी पदयात्रेचे जेजुरी येथून आठवड्यापूर्वी प्रस्थान झाले. ही पालखी काऊदऱ्यावर दाखल झाल्यानंतर जानाईदेवी अन्नदान पदयात्रा सेवा आणि जेजुरी ग्रामस्थांतर्फे आयोजिलेल्या निसर्गपूजेला सालाबादप्रमाणे प्रतिसाद मिळाला. जेजुरीतून धार्मिक विधीपूर्वक चांदीच्या रथासह पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या पारंपारिक बैलगाड्यांचा ताफा पूजेकरीता आला होता. दीडशे किलोमीटरचा जयाद्री ते सह्याद्री असा प्रवास करत भाविक प्रथम निसर्गपूजेला काऊदऱ्याला पोहोचले. तद्‌नंतर मुक्कामी जानुबाई निवकणे येथे यात्रा उत्साहात संपन्न झाली. निसर्गपूजेत स्थानिक डोंगरवासी महिलांना साडीचोळी, वृक्ष देवून सन्मानित करण्यात आले. वसुंधरेला भंडारा उधळून हरितक्रांती व पर्जन्यवृष्टीकरीता प्रार्थना केली गेली. निसर्गपूजा सोहळ्यास जेजुरी ग्रामस्थांसह निसर्गप्रेमींनी मोठी उपस्थिती दर्शवली.