अभिनेत्री कंगना रनौत ही कायमच तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहिली आहे. नुकतीच तिने दिवंगत इंदिरा गांधी याच्या ऑपरेशन ब्लू स्टारसंदर्भात केलेल्या एका वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टवरून मोठा वाद निर्माण झाला होता. यासंदर्भात तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून तिला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी कंगना रनौतवर निशाणा साधला आहे. “तिला दिलेली झेड प्लस सुरक्षा देखील तिला वाचवू शकत नाही”, असं नवाब मलिक यांनी म्हटल्याचं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टारच्या माध्यमातून पंजाबच्या सुवर्ण मंदिरात मोठी कारवाई केली होती. याचसंदर्भात कंगना रनौतनं काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली होती. यामध्ये सुवर्णमंदिरात केलेल्या कारवाईबाबत तिने इंदिरा गांधी यांच्या आक्रमक भूमिकेचं कौतुक केलं होतं. यासंदर्भात वाद निर्माण झाल्यानंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काय म्हणाले नवाब मलिक?

नवाब मलिक यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना कंगना रनौतवर निशाणा साधला. “कुणीही कायद्यापेक्षा वरचढ नाही. तिला केंद्राकडून पुरवण्यात आलेली झेड प्लस सुरक्षा देखील तिला वाचवू शकणार नाही”, असं मलिक यांनी महटलं आहे.

कंगना रनौतच्या पोस्टविषयी सिख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा यांच्या शिष्टमंडळाने मुंबईच्या पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली. तिच्या विधानाबाबत सिरसानं तक्रार देखील दाखल केली आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांना देखील ट्विटरवर टॅग करून तिच्याविरोधात तक्रार केली आहे. शिवाय, कंगनाला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची विनंती देखील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हटलं होतं कंगनानं पोस्टमध्ये?

“आज कदाचित खलिस्तानी दहशतवादी सरकारवर भारी पडत असतील. पण एका महिलेला आपण विसरता कामा नये. भारताच्या अशा एकमेव महिला पंतप्रधान ज्यांनी या सगळ्यांना आपल्या पायांखाली चिरडून टाकलं होतं. त्यांच्यामुळे देशाला किती भोगावं लागलं हे जरी सत्य असलं, तरी त्यांनी या सगळ्यांना मच्छराप्रमाणे चिरडून टाकलं. त्यांच्या जिवाची पर्वा न करता. पण त्यांनी देशाचे तुकडे होऊ दिले नाहीत. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक दशकं उलटल्यानंतरही आजही त्यांच्या नावाने हे लोक थरथर कापतात”, असं स्टेटस कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ठेवलं होतं.