नांदेड : लाडक्या बहिणींसह विविध योजनांचा भार तसेच नैसर्गिक आपत्तीनंतर बाधितांच्या मदतीकरिता करावी लागलेली तरतूद यामुळे राज्यातील आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील कामांसाठी निधी देण्यात अडचणी निर्माण झाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातर्फे प्रथमच निवडून आलेल्या आमदारांनाच निधी देण्याचे ठरवले आहे.

आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रवादी’ने दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष तसेच आमदारांची व्यापक बैठक मुंबईत घेतली. पक्षाध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सर्वांना मार्गदर्शन करताना निवडणुकीसाठी सज्ज होण्याचा मंत्र दिला; पण पदाधिकार्‍यांनी निधीसंदर्भात केलेल्या मागण्यांवर सर्वच जिल्ह्यांची निराशा झाली.

वरील बैठकीमध्ये काही जिल्हाध्यक्षांना बोलण्याची संधी देण्यात आली; पण नांदेडहून गेलेल्या चिखलीकर समर्थक दोन्ही जिल्हाध्यक्षांना त्यांत स्थान मिळाले नाही. ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर हेही मुंबईला गेले होते. तथापि ते वरील बैठकीत सहभागी झाले नाहीत.

आमदारांच्या मतदारसंघामध्ये गेल्या एक वर्षापासून कोणत्याही कामासाठी निधी उपलब्ध नसल्याने विकास कामे ठप्प असून कार्यकर्ते आणि जिल्हास्तरीय पदाधिकार्‍यांच्या सर्वसाधारण अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. सर्वत्र निराशेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत अजित पवार यांनी सर्वांना निवडणुकीच्या कामाला लागा, पक्षसंघटन व्यापक करा अशी सूचना दिली.

‘राष्ट्रवादी’तर्फे काही दुसर्‍यांदा तर काही नेते त्याहून अधिकदा विधानसभेवर निवडून आले असून त्यांना सध्या निधी दिला जाणार नाही. नांदेड जिल्ह्यातील आ.चिखलीकरांप्रमाणे जे प्रथमच या पक्षातर्फे निवडून आले अशा मोजक्या आमदारांनाच ‘दादांच्या निधीचा लाभ’ मिळणार असल्याचे पक्षाच्या एका जिल्हाध्यक्षाने बैठकीहून आल्यानंतर सांगितले.

नांदेड जिल्ह्यात भाजपाने यापूर्वीच संघटनात्मक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केलेली आहे. त्यापाठोपाठ राज्य सरकारमध्ये भागीदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही निवडणूक तयारी सुरू केली असून प्रथमदर्शनी या निवडणुकीची सारी सूत्रे आपल्या हाती राहतील, याची नेपथ्यरचना आ.चिखलीकर यांनी आतापासूनच केली आहे. अलीकडच्या काळातील त्यांच्या वक्तव्यांमुळे जिल्ह्यात भाजपासोबतची युती अनिश्चिततेच्या गर्ततेमध्ये सापडली आहे. चिखलीकरांनी आपल्या मर्जीनुसार ग्रामीण भागाचे दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त करून घेतले; पण मागील अडीच-तीन महिन्यांत दोन्ही जिल्हाध्यक्षांसह महानगराचे नवे अध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा यांनाही आपल्या कार्यकारिणीची निवड करता आलेली नाही.

चिखलीकरांच्या आग्रहावरून नेमलेले दक्षिण जिल्ह्याचे अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्या नियुक्तीस ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर यांनी त्यांच्या नावाच्या घोषणेपासूनच आपला विरोध उघड केला. हा विषय त्यांनी पक्षाच्या नेत्यांपर्यंत उपस्थित केला होता. दोन दिवसांपूर्वी खतगावकर यांनी प्रदेशाध्यक्ष खा.तटकरे यांची भेटही घेतली; पण त्यांच्या मागणीबाबत पक्षाने काय भूमिका घेतली आहे, ते मुंबईतील घडामोडींतून स्पष्ट झाले नाही. इकडे होटाळकर यांनी मुंबईहून येताच धर्माबाद नगरपालिका निवडणुकीसंदर्भात बुधवारी तेथे जाऊन बैठक घेतली.

संपर्कमंत्री बाबासाहेब पाटील आज नांदेडमध्ये

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना नांदेड जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले असून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भातील पहिल्या बैठकीसाठी ते शुक्रवारी (दि.१७) नांदेडमध्ये येत आहेत. त्यांच्या तसेच अन्य स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत दुपारी १ वाजता चिखलीकर यांच्या निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सर्व बाबींचा आढावा घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.