Dhananjay Munde : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. राज्यभरात वेगवेगळ्या मतदारसंघात युती आणि आघाडीसह इतर पक्षांच्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरु आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळणार आहे. सध्या सुरु असलेल्या प्रचाराच्या सभेंच्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेते सत्ताधाऱ्यांवर आणि सत्ताधारी पक्षातील नेते विरोधी पक्षांतील नेत्यांवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे.

यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील परळी विधानसभा मतदारसंघात सभांचा धडाका लावला आहे. आज झालेल्या एका सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा रंगली आहे. माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना सुरु आहे, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाचा रोख नेमकी कुणाकडे होता? याबाबत आता चर्चा रंगल्या आहेत. याच सभेत बोलताना त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचाही गेम केला. आता माझा गेम करायची ही व्युहरचना कशासाठी असं म्हटलं आहे.

हेही वाचा : “महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर महिलांना प्रति महिना ३ हजार रुपये आणि बस प्रवास मोफत”, राहुल गांधींची गॅरंटी

धनंजय मुंडे काय म्हणाले?

“हे सर्व कशासाठी सुरु आहे? का माझी एवढी भिती आहे? त्यांना का वाटतं की महाराष्ट्रामध्ये काम करणारा व्यक्ती उद्या अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे आता व्यूहरचना करून राजकीय अस्त करा. पण ही भीती धनंजय मुंडेंची नाही तर ही भीती जनतेने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाच्या ताकदीची आहे. अशीच ताकद तुम्ही येणाऱ्या पाच वर्षांत द्या आणि आशीर्वाद द्या. पण मला असा आशीर्वाद नको, तर परळी विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयाचा आशीर्वाद हवा आहे”, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच धनंजय मुंडे यांनी सभेत बोलताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. तसेच मला कधी कधी तर हे देखील कळत नाही की, माझ्या सारखा व्यक्ती छोट्या घरात जन्माला आला मग तरीही माझी एवढी भीती का वाटत असेल? तुम्हाला भीती वाटत नाही ना? मग बाहेरच्यांना का भीती वाटते?, असं यावेळी धनंजय मुंडे यांनी म्हटलं. मात्र, त्यांच्या या विधानाचा रोख नेमकं कुणाकडे होता? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.