नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षाचा नांदेड जिल्ह्यात एकच आमदार असला, तरी या पक्षात माजी आमदार अनेक असे चित्र झाले असून सुभाष साबणे यांनी या पक्षात प्रवेश घेतल्यानंतर जिल्ह्यामध्ये हा पक्ष माजी आमदारांच्या संख्याबळात भाजपाच्या बरोबरीत आला आहे. येत्या काही दिवसांत अन्य एक माजी आमदार ‘राष्ट्रवादी’त दाखल होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गेल्या आठवड्यात नागपूर येथे झालेल्या चिंतन शिबिराच्या समारोपप्रसंगी पक्षाध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा.प्रफुल्ल पटेल प्रभृतींच्या उपस्थितीत मुखेड आणि देगलूर या दोन मतदारसंघांचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी प्रवेश घेतला. साबणे दीर्घकाळ एकत्रित शिवसेनेचे आमदार होते. मागील विधानसभा निवडणूक त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे लढवली होती. त्यात ते पराभूत झाले.

गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने नांदेड जिल्ह्यात लक्षणीय पक्षविस्तार केला. मुखेडचे माजी आमदार अविनाश घाटे यांनी सर्वप्रथम या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर, ओमप्रकाश पोकर्णा आणि मोहन हंबर्डे हे माजी आमदारही अजित पवारांच्या पक्षामध्ये सामील झाले. खतगावकर आणि हंबर्डे यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने मोठे शक्तिप्रदर्शनही करण्यात आले. त्यानंतर साबणे यांच्या प्रवेशामुळे या पक्षातील माजी आमदारांची संख्या ५ झाली असून कंधारचे माजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पक्षप्रवेशाची चर्चाही सुरू आहे.

जिल्ह्यातील भाजपामध्ये असलेल्या माजी आमदारांमध्ये डी.बी.पाटील, अशोक चव्हाण, अमिता चव्हाण, दत्तात्रेय पांडुरंग सावंत आणि अमरनाथ राजूरकर यांचा समावेश आहे. खा.अशोक चव्हाण यांनी या पक्षात प्रवेश केला तेव्हा काँग्रेसच्या जीतेश अंतापूरकर यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला; पण विधानसभा निवडणुकीनंतर चव्हाण यांच्या हाती अन्य पक्षांतील एकही माजी आमदार हाती लागला नाही. सावंत अनेक महिने कुंपणावर होते. पण काही महिन्यांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांच्या नांदेड दौर्‍यात त्यांच्या गळ्यामध्ये भाजपाचे उपरणे घालण्यात आले.

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी विधान परिषद सदस्य राम पाटील रातोळीकर हे सध्या राजकारणात सक्रिय नसले, तरी ते भाजपामध्ये कायम आहेत. त्यामुळे भाजपातील माजी आमदारांची संख्या ६ झाली आहे. नांदेड जिल्ह्यात माजी आमदारांची संख्या आता लक्षणीय आहे. समाजवादी चळवळीतील गंगाधर पटने यांनी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांत प्रतिनिधित्व केले. मागील काही वर्षांत जिल्ह्यातील अनेकांनी पक्षांतरे केली, तरी पटने आणि माजी खासदार व्यंकटेश काब्दे हे दोनच नेते जनता दलाशी एकनिष्ठ राहिले. कंधारचे शेकापचे माजी आमदार गुरुनाथ कुरुडे हेही मूळ पक्षासोबत आहेत. राष्ट्रवादी-शरद पवार पक्षामध्ये ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम, सूर्यकांता पाटील आणि डॉ.माधव किन्हाळकर हे माजी आमदार कार्यरत आहेत. शिवसेनेचे माजी आमदार डॉ.डी.आर.देशमुख हे मागील अनेक वर्षांपासून कोणत्याही पक्षासोबत नाहीत.

काँग्रेस पक्षाच्या माजी आमदारांमध्ये ईश्वरराव भोसीकर हे वयाने आणि राजकीय अनुभवाने सर्वात ज्येष्ठ. वयाची नव्वदी पार केल्यावरही ते काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. हनमंतराव पाटील बेटमोगरेकर आणि माधवराव जवळगावकर यांना भाजपामध्ये घेण्याचा प्रयत्न झाला होता; पण हे दोघेही काँग्रेसमध्ये आहेत. अनसूया प्रकाश खेडकर आणि रोहिदास खोब्राजी चव्हाण हे दोन माजी आमदार शिवसेना उद्धव ठाकरे पक्षामध्ये आहेत. हदगावचे माजी आमदार सुभाष वानखेडे यांनी काँग्रेस, भाजपा पुन्हा शिवसेना असा प्रवास करून सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आश्रय घेतला आहे. कंधारचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी काही वर्षांपूर्वी तेलंगणातील भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला होता. पण नंतर हा पक्षही त्यांनी सोडला. ते सध्या कोणत्याही राजकीय पक्षामध्ये नाहीत.