scorecardresearch

“महाराष्ट्रात आग लावण्याचे धंदे बंद करा”; अमोल मिटकरी फडणवीसांवर संतापले; म्हणाले “यापुढे जर शरद पवारांचं नाव घेतलं…”

“कोणत्याही घटनेत शरद पवारांचं नाव गोवण्याचा प्रयत्न केला तर ओबीसी, मराठा आणि महाराष्ट्राची जनता फडणवीसांना माफ करणार नाही”

NCP, Amol Mitkari, Sharad Pawar, BJP, Devendra Fadanvis, Rajya Sabha, Chhatrapati Sambhajiraje
Amol Mitkari comments on devendra fadnavis

Amol Mitkari on Devendra Fadnavis: संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. संभाजीराजेंना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात असताना ऐनवेळी कोल्हापूरच्या संजय पवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे अपेक्षाभंग झाल्याची भावना संभाजीराजे छत्रपतींच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यातच आता विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जबाबदार धऱलं आहे. यावरुन अमोल मिटकरी यांनी एबीपी माझाशी बोलताना संताप व्यक्त केला असून महाराष्ट्रात आग लावण्याचे धंदे बंद करावेत असं सुनावलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

राष्ट्र्वादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा विषय आधी सुरू केला होता, असं फडणवीस नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. “आधी शरद पवारांनी हा सगळा विषय सुरू केला. त्यानंतर ज्या दिशेने तो विषय गेला, ते सगळं वेगळंच काहीतरी झालं आहे. कदाचित त्यांची (संभाजीराजे छत्रपती) कोंडी करण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. पण तो त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर मी बोलण्याचं कारण नाही”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

“संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय”, देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्र सरकारवर निशाणा!

मिटकरींचा संताप

अमोल मिटकरी यांनी एबीपी माझाशी बोलताना यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “देवेंद्र फडणवीसांनी आता महाराष्ट्रात आग लावण्याचे धंदे बंद करावेत. कधीही उठसूठ शरद पवारांबद्दल काहाही बोलायचं. ज्ञानवापी मंदिर, ओबीसी आरक्षण आणि आता संभाजीराजेंच्या नावानेही राजकारण करुन मराठा, ओबीसी यांना पवारांविरोधात उभं कऱण्याचे आगलावे धंदे फडणवीसांनी बंद करावेत”.

“फडणवीसांच्या कपटनीतींपासून महाराष्ट्राने सावध राहावं”

“देवेंद्र फडणवीसांना सगळीकडेच पवारच दिसतात का? त्यांच्या वक्तव्याला काही आधार नाही, अगदी बिनबुडाचं वक्तव्य आहे. शरद पवारांबद्दल बोलताना त्यांनी भान ठेवावं आणि यापुढे जर कोणत्याही घटनेत शरद पवारांचं नाव गोवण्याचा प्रयत्न केला तर ओबीसी, मराठा आणि महाराष्ट्राची जनता फडणवीसांना माफ करणार नाही. फडणवीसांचं हे आग लावणारं वक्तव्य असून त्यांच्या कपटनीतींपासून महाराष्ट्राने सावध राहावं,” असा सल्ला मिटकरींनी यावेळी दिला.

संभाजीराजेंची कोंडी झालीये का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “संभाजीराजेंनी कोणत्याही पक्षात जाणार नाही आणि अपक्ष निवडणूक लढवणार अशी भूमिका घेतली आहे. त्यांनी कोणताही निर्णय घेतला तरी महाराष्ट्र स्वागत करेल. एकेकाळी ते राष्ट्रवादीकडून निवडणूक लढले होते, मागील वेळी भाजपाच्या कोट्यातून खासदार झाले. आता शिवसेनेची काही ठराविक मतं होती, त्यांनी पक्षप्रवेशाची अट ठेवली होती. शरद पवारांनी पाठिंबा दिला असताना कोंडी केल्याचं म्हणण्याचा फडणवीसांना काय अधिकार आहे? इतकाच जर त्यांना संभाजीराजे आणि गादीबद्दल आदर आहे तर त्यांना सन्मानाने आपल्याकडे घ्यावं. कोंडी झाली हे पेरण्याचं काम जे फडणवीस करत आहेत ते आग लावण्याचं काम आहे”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp amol mitkari sharad pawar bjp devendra fadanvis rajya sabha chhatrapati sambhajiraje sgy

ताज्या बातम्या