भाजपाकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. तर, पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना मात्र संधी मिळालेली नाही, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया देताना खडसेंच्या बाबतीतही हेच झालं होतं असं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Maharashtra News Live : महाराष्ट्रासह देशभरातील क्षणोक्षणीचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

“भाजपाने राज्यसभा निवडणूकीत जास्त उमेदवार दिले आहेत. मात्र आघाडीचे उमेदवार निवडून येतील. आता विधानपरिषदेच्या निवडणुकीचीही तयारी करावी लागेल. कंबर कसावी लागेल. महाविकास आघाडीचे उमेदवार राज्यसभेवर सर्व निवडून येतीलच आणि त्याच पावलावर पाऊल टाकून विधानपरिषदेतही आघाडीचे उमेदवार निवडून येतील,” असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

विधानपरिषद निवडणूक २०२२ : भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर; श्रीकांत भारतीय, उमा खापरेंना संधी

“राज्यसभा किंवा विधानपरिषदेतील कोणीही घोडेबाजाराला बळी पडणार नाही. आमचे सर्व आमदार प्रामाणिक राहतील,” अशी खात्रीही छगन भुजबळ यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

“पंकजा मुंडेंना संधी द्यायला हवी होती”

“पंकजा मुंडे यांनी दिलेल्या संधीचं सोनं करेन असं वक्तव्य केल्याचं वाचलं होतं. परंतु त्यांना डावलण्यात आलं आहे. त्यांना पहिल्या क्रमांकावर उतरता आलं असतं. संधी द्यायला हवी होती. खडसेंच्या बाबतीत तेच झालं होतं. पंकजा मुंडे यांना परत घेतलं जाईल असं वाटलं होतं. परंतु असं काही झालं नाही. याचा परिणाम हा लोकांवर व समाजावरही होत असतो,” असे सूचक विधानही छगन भुजबळ यांनी केलं.

“नुपूर शर्मा म्हणजे भारत नव्हे”

“कोणत्याही धर्मगुरूविरोधात बोललं जाऊ नये, अपमानकारक बोललं जाऊ नये. प्रत्येक धर्माचा आदर राखला गेला पाहिजे. हे आपल्या संविधानात लिहिले आहे. आता जे कुणी धमक्या देत आहेत त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, हे भारताने केलेले नाही. हे भारतातील एका पक्षाच्या कार्यकर्त्याने केले आहे. त्याची शिक्षा इतर भारतीयांना नको. एखाद्या पक्षात असे माथेफिरू लोक असतात. केवळ प्रसिद्धी मिळावी त्यासाठी काहीजण करत असतात. त्या नुपूर म्हणजे भारत नव्हे…त्या एका पक्षाच्या लहान प्रवक्ता आहेत. त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. त्यामुळे अरब इस्लामिक देशातील लोक सहकार्य करतील,” असंही छगन भुजबळ म्हणाले.

कृपाशंकर सिंग यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून शाळांमध्ये मराठी विषय शिकवला जावा असे म्हटले आहे असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावर भुजबळ टोला लगावताना म्हणाले की, “सगळ्यांनी सर्व भाषा शिकाव्यात. विशेष करुन मुंबईत उत्तर भारतीय लोक मुंबईत मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांना मराठी शिकायला कृपाशंकर सिंग यांनी सांगावे”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp chhagan bhujbal ncp pankaja munde vidhan parishad sgy
First published on: 08-06-2022 at 15:05 IST