भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी करोनाची लागण झाली असून सध्या त्या विलगीकरणात आहेत. पंकजा मुंडे यांनी गुरुवारी सकाळी ट्विट करत आपल्याला करोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान यानंतर त्यांचे बंधू आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनजंय मुंडे यांनी बहिणीसाठी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी मोठा भाऊ म्हणून मी सोबत असल्याचं सांगत त्यांना धीर दिला आहे. धनंजय मुंडे यांनीही करोनाचा सामना केला असल्याने पंकजा मुंडेंना होणाऱ्या त्रासाची मला जाणीव असल्याचंही म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंकजा मुंडेंचं ट्विट-
“माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मी आधीच काळजी घेत असून विलगीकरणात आहे. मी अनेक लोकांना तसंच करोना रुग्णांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून त्याद्वारे संसर्ग झाला असावा. माझ्यासोबत जे होते त्यांनीदेखील चाचणी करुन घ्या..काळजी घ्या,” असं पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे.

धनंजय मुंडेंची फेसबुक पोस्ट-
“पंकजाताई, करोना विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई,” असं धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.

२४ एप्रिलला शनिवारी संध्याकाळी भाजपा खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या धाकट्या बहीण प्रीतम मुंडे यांनी प्रकृती अस्वस्थ्य जाणवत असल्यामुळे उपचार घेत असल्याचा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केला होता. त्यावेळीही धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या होत्या.

प्रीतम मुंडेंनी व्हिडीओत काय सांगितलं होतं –
खासदार प्रीतम मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून लोकांना आवाहन करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. “गेल्या आठवड्यात १४ ते १८ एप्रिलमध्ये जिल्ह्यातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. १८ तारखेला मुंबईत आल्यानंतर मला कोरडा खोकला, सर्दी, ताप आणि प्रचंड अशक्तपणा हे लक्षणं जाणवायला लागले. २१ तारखेला मी RTPCR चाचणी केली. पण त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. पण सगळ्यांना मी आवाहन करते की फक्त RTPCR चाचणी निगेटिव्ह आली, म्हणून आपल्याला करोना नाही या भ्रमात राहू नका. जर आपल्याला लक्षणं असतील, तर त्वरीत आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. मी देखील माझ्या डॉक्टरांशी संपर्क साधला आणि त्यांनी दिलेली ट्रीटमेंट घरीच आयसोलेशनमध्ये राहून मी घेत आहे”, असं प्रीतम मुंडे यांनी सांगितलं होतं.

“योग्य उपचार आणि काळजी घ्या”
धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत सदिच्छा व्यक्त केल्या होत्या. “बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांना काही लक्षणं आढळल्यामुळे त्या उपचार घेत असल्याचं समजलं. ताई, टेस्ट निगेटिव्ह आली असली, तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार आणि काळजी घ्या. प्रभू वैद्यनाथ कृपेनं लवकर बऱ्या व्हाल ही खात्री आणि सदिच्छा व्यक्त करतो”, असं धनंजय मुंडे यांनी ट्वीटमध्ये दिल्या होत्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp dhananjay munde facebook post for bjp pankaja munde covid 19 sgy
First published on: 29-04-2021 at 14:02 IST