राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाने अलीकडेच शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. सत्तेत सहभागी होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवारांना तुरुंगात पाठवू, असं वक्तव्य केलं होतं. पण आता देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना सत्तेत सहभागी करून घेतलं असून त्यांना मंत्रिमंडळातही स्थान दिलं आहे.

दुसरीकडे, देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसेंवर टीकास्र सोडलं होतं. भूखंडात तोंड काळं केलं नसतं, तर तुम्ही आता आपल्या कुटुंबाबरोबर (भाजपा) असता, अशी टीका फडणवीसांनी खडसेंवर केली होती. या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, आता ते सर्वजण तुमच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत, आता तुमच्या तोंडाला कुलूप लावलं आहे का? अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली. ते जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरसभेत बोलत होते.

हेही वाचा- “…मग स्वत:ला काय शिक्षा देणार? हेही देशाला सांगा”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आरोपावर शरद पवारांचं मोठं विधान

यावेळी एकनाथ खडसे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीसाठी रक्ताचं पाणी करून मी आयुष्यभर या जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात मेहनत केली. पण त्यांनी माझे काय हाल केले? हे सर्वांना माहीत आहे. ज्या माणसाने तुम्हाला मोठं केलं, त्याची ही परिस्थिती आहे. वापरा आणि फेकून द्या, ही भाजपाची भावना आहे. आता भाजपात पहिल्यासारखं जुन्या लोकांना स्थान नाही. भाजपात सगळेच बाहेरचे आणले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटींचा आरोप केला. राष्ट्रवादी जर एवढी भ्रष्टाचारी पार्टी आहे, तर मग तुम्हीच आरोप केलेल्या अजित पवारांना मंत्रिमंडळात का घेतलं? असा सवालही खडसेंनी विचारला.

हेही वाचा- “पैसा आलाय, माज आलाय, मस्ती आलीय”, एकनाथ खडसेंची भाजपावर सडकून टीका…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ खडसे पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस एकदा म्हणाले होते, भूखंडात काळं केलं नसतं तर तुमचं तोंड काळं झालं नसतं. पण मी तर काहीच केलं नाही. ज्यांनी तोंड काळं केलं, असं तुम्ही म्हणत होतात. आता ते सर्वजण तुमच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले आहेत. आता तुमच्या तोंडाला कुलूप लावलंय का?”