छत्रपती संभाजीनगर : परंडा तालुक्यातील वडनेरमध्ये दोन वर्षाचे एक मूल, आजी आणि त्या मुलाचे आई- वडील असे पाच जण २४ तास पाण्यात अडकले होते. यांची सुटका करण्यासाठी लष्करी दल आले. पण त्यांची बोट सुरूच होईना. त्यामुळे बांधलेली दोरी सोडवून या जवानांसह अडकलेल्या चौघांचे प्राण वाचविण्यासाठी गावकरी पुढे सरसावले. यात अग्रेसर होते खासदार ओम राजेनिंबाळकर. रात्री पाण्यात उतरुन एका झाडात ओंडका अडकवून पोहता येणाऱ्या सहा- सात जणांबरोबर बोटीची दोरी ओढून छातीभर उंच पाण्यातून सर्वांना बाहेर काढले. या खासदारांच्या कृतीचे धाराशिवसह मराठवाड्यात कौतुक होत आहे.

ओम राजेनिंबाळकर हा नेताच मुळात लढवय्या वृत्तीचा असल्याने संकटात धावून येतो अशी प्रतिक्रिया उमटत आहे. दोन दिवसापूर्वी भूम तालुक्यात एक तलाव फुटला होता. याच साखळी बंधाऱ्यातील दुसरा तलावही फुटेल अशी शेतकऱ्यांची तक्रार होती. त्याची ही पाहणी ओम राजेनिंबाळकर यांनी केली. ‘सर्वसामांन्यांमध्ये मिळसणारा’ अशी ओम राजेनिंबाळकर यांची प्रतिमा आहे. कोणाचाही दूरध्वनी येवो, तो उचलून त्याला समाधान वाटेल असे बोलणारा नेता अशी त्यांची धाराशिव जिल्ह्यात प्रतिमा आहे. वडील पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्येनंतर राजकारणात आलेल्या ओम राजेनिंबाळकर तेव्हा अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्गाला शिकत होते.

तेथून आल्यानंतर तेरणा साखर कारखान्यातून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. २००७ मध्ये त्यांनी तेरणा साखर कारखाना निवडणुकीमध्ये यश मिळवले. तेव्हा डॉ. पद्मसिंह पाटील यांची या कारखान्यावर पकड होती.या साखर कारखान्यातील अनेक गैरप्रकार तेव्हा काँग्रेसचे नेते नानासाहेब पाटील यांनी चव्हाट्यावर मांडायला सुरुवात केली होती. याचा लाभ ओम राजेनिंबाळकर यांना झाला. तेरणा साखर कारखान्यात विजय मिळविल्यानंतर त्यांनी २००९ च्या निवडणुकीमध्ये राणा जगजीतसिंह पाटील यांचा पराभव केला. पुढे २०१९ आणि २०२४ मध्ये ते खासदार म्हणून निवडून आले. हे सारे करत असताना गावागावातील तरुणांशी त्यांनी संपर्क वाढवला. एखाद्या गावात तरुण मुले क्रिकेट खेळत असतील तर त्यात सहभागी व्हायचे. गावात एखाद्याने कीर्तना बोलावले तरी जायचे आणि येणाऱ्या प्रत्येकाचा दूरध्वनी घेत होईल तेवढी मदत करायची असा त्यांच्या कामाचा भाग.

वडनेर येथील प्रसंगाविषयी बोलताना ओम राजेनिंबाळकर म्हणाले, ‘ हेलिकॉप्टरने २७ जणांना बाहेर काढल्यानंतर ते खराब हवामानामुळे परत येऊ शकले नाही. जवानांची एक चमू घटनास्थळी पोहचला होता. वडनेरची स्थिती पाहण्यासाठी सायंकाळी ६.३० च्या सुमारास पोहचलो होते. तेरणा नदीला पाणी आल्यावर शेतातून मोटारी काढण्यासाठी पूर्वी छातीएवढ्या पाण्यात आम्ही उतरत होतो. चांगले पोहता येत असल्याने आपण मदत करू, असा विश्वास होता. चंद्रकांत नाराण चौधरी, श्रीकृष्ण चंद्रकांत चौधरी, भामाबाई नारायण चौधरी, व शंभू श्रीकृष्ण चौधरी यांचे जीव वाचले.