राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचं कौतुक केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांचं नाव न घेता त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर होत्या. दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे.
बारामती दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणातून महागाईचा मुद्दा मांडला होता. याबाबत सविस्तर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आरएसएसच्या नेत्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
देशातील वाढत्या महागाईवर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आज माझ्या वाचनात असं आलंकी, आरएसएसच्या एका वरिष्ठ नेत्याने महागाई आणि बरोजगारीबाबत सविस्तर भाष्य केलं आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करते. कारण काही गोष्टी वास्तविकतेसाठी आणि देशासाठी खूप महत्त्वाच्या असतात. मागील दीड ते दोन वर्षांपासून आम्ही सगळेजण संसदेत देशातील महागाई, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेबाबत सातत्याने बोलत आहोत. पण यामध्ये कुठलंही राजकारण न आणताआरएसएसच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेबाबत जो मुद्दा मांडण्यात आला, त्याचं मी मनापासून स्वागत करते. हा देशाचा प्रश्न आहे. याबद्दल केंद्र सरकारला माझी विनंती आहे, त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल, बेरोजगारी आणि महागाईबद्दल गंभीर होणं अतिशय गरजेचं आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दत्तात्रेय होसबाळे अर्थव्यवस्थेबाबत काय म्हणाले?
आरएसएसचे वरिष्ठ नेते दत्तात्रेय होसबाळे यांनी रविवारी देशातील महागाई आणि बेरोजगारीबाबत चिंता व्यक्त केली होती. देशातील गरिबी, बेरोजगारी आणि वाढती विषमता ही चिंतेची बाब असून, तरुणांना उद्योगांकडे वळवून रोजगार मागणारे हेच रोजगारदाते बनतील, यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय दत्तात्रेय होसबाळे यांनी केलं होतं. स्वदेशी जागरण मंचाच्या ‘स्वावलंबी भारत अभियान’ या उपक्रमांतर्गत व्याख्यानमालेत होसबाळे बोलत होते.