अतिवृष्टीकाळात नागरिकांची जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मदतकार्य करावे असं आवाहन विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षितस्थळी आसरा घेऊन आवश्यक खबरदारी घ्यावी असंही आवाहन त्यांनी केलं आहे. तसंच बचाव व मदतकार्यासाठी प्रशासन व शासकीय यंत्रणाना सर्वांनी सहकार्य करावे असं ते म्हणाले आहेत.

“भारतीय हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा आणि राज्यात सर्वदूर होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर समुद्र, नदी किनारपट्टीवरील नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. जिल्हा, राज्य प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा. जीवित, वित्तहानी होणार नाही यासाठी सर्वांनी सतर्क राहून काळजी घ्यावी,” असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

अतिवृष्टीचा इशारा कायम ; मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरीत पाऊस वाढणार

पुढे ते म्हणालेत की, “राज्य सरकारनेही एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, महसूल आदी बचाव, मदत यंत्रणांना सतर्क ठेवून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळेल याची निश्चिती करावी. अतिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत बचाव, मदत कार्यात विरोधी पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य, मदत करावी. राज्यातील नागरिकांची जीवित, वित्तहानी टाळण्यासाठी विरोधी पक्ष कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मदतकार्यात सहभागी व्हावे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिवृष्टीचा इशारा कायम

अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प येत असल्याने मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. या भागात नद्यांची पाणीपातळी वाढली असून, काही भागांत दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. गुरुवारपासून दोन ते तीन दिवस कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी (रेड ॲलर्ट) होण्याचा इशारा हवामान विभागाकडून कायम ठेवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड आदी जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.