राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पत्र प्रसिद्ध करत शरद पवारांपासून वेगळे होण्याची भूमिका का घेतली? याचे विवेचन केले. पवारांपासून फारकत घेऊन सात महिने उलटल्यानंतर हा पत्रप्रपंच कशासाठी? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी खुमासदार भाष्य केले आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलत असताना जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या पत्राचा उल्लेख केला. तसेच सत्तेशिवाय विकास होत नाही, हे अजित पवारांचे म्हणणे मला मान्य असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
काय म्हणाले जयंत पाटील?
जयंत पाटील म्हणाले, अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी पत्र लिहिले. ते म्हणाले की, सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही. हे खरंय, सत्ता असल्याशिवाय विकास करता येत नाही. पण विकासाला तत्त्वांची झालर असली पाहीजे. विकासाला काही धोरण असलं पाहीजे. अजित पवार यांचे पत्र महाराष्ट्राच्या जनतेला आहे. पण त्यात ते म्हणाले, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या सारखी माझी कामाची शैली आहे. आमचे त्याबाबत दुमत नाही. पण दुसऱ्यांची (भाजपाचे) हरकत येऊ शकते. आपली तुलना कुणाशी करायची? याचं भान तिकडं गेल्यावर ठेवण्याची गरज आहे.
अर्थसंकल्पातील तरतुदींवरून जयंत पाटील आक्रमक; सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाले, “बाटाचा बूट…”
‘बच्चू भाऊ ठाम भूमिका घ्या’
जयंत पाटील सभागृहात अजित पवारांबाबत चिमटे काढणारे विधान करत असताना बच्चू कडू यांनी मध्येच प्रतिक्रिया दिली. यावर जयंत पाटील यांनी बच्चू कडूंनाही खिलाडू वृत्तीने राजकीय सल्ला दिला. ते म्हणाले, “बच्चू भाऊंची स्वतःची काहीच भूमिका नाही. कोणत्या पक्षातून कोण कुठं जातोय, हे बघत बसले आहेत. तुम्ही ठामपणाने भूमिका घ्या. तुम्हाला आता तिकडे जाण्याचा पर्याय नाही, त्यामुळे ठाम भूमिका घ्या.”
अजित पवारांना फुले-शाहू-आंबेडकरांचा विसर पडला
“अर्थमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण भाषणात कुठेही शाहू – फुले – आंबेडकर यांचे नाव घेतलेले नाही, ही चिंतेची बाब आहे. योजनांच्या नावांपलीकडे कुठेही उल्लेख नव्हता. विचार सोडून जर विकास होत असेल तर त्याला फारसा अर्थ नाही. तरुणांच्या हाताला काम कसं देणार याचाही यात उल्लेख नव्हता. बुलेट ट्रेनचा फायदा अहमदाबाद व गुजरातला होणार हे जगजाहीर आहे तरी आपण सहन करतोय. कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी सरकारने एक चकार शब्द काढला नाही, शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार गंभीर आहे हे या बजेटमधून कुठेच दिसत नाही. रुग्णवाहिकेसाठी १०८ ची योजना सुरु असताना नवी योजना कशासाठी? या सर्व गोष्टी आपण कुठेतरी दुर्लक्षीत करत आहोत. वाढवण बंदर करत असताना स्थानिकांना विश्वासात घेऊन करा. विकासाला काही धोरण व काही तत्व असले पाहिजे.
कवितेमधून सरकारवर टीका
अर्थसंकल्पावर भाषण करत असताना जयंत पाटील यांनी अखेरीस एक कविता सादर केली. ज्यातून त्यांनी विविध प्रश्नांचा उल्लेख करत सरकारवर शरसंधान केलं. ती कविता खालीलप्रमाणे :
हाताला काम नाही, सुशिक्षितांना रोजगार नाही
दुष्काळ, अतिवृष्टीच्या चकरात ग्रासला शेतकरी
पोटापाण्यासाठी वणवण सारी,
आपल्याला काय फक्त बोलून निघून जाण्याची घाई..!
आरोग्य यंत्रणा ढिसाळ झाली,
रुग्णांच्या जीवाला किंमत नाही.
मायेच्या अश्रूची थट्टा झाली, गरिबांना कोण वाली?
आपल्याला काय फक्त बोलून निघून जाण्याची घाई..!
इथे दिवसा ढवळ्या महिला सुरक्षित नाहीत,
किड्या मुंग्यांसारखे त्यांचे जगणे बाई,
धर्माधर्मातील तिढा सुटेना काही, आगीत तेल ओतायला आहेत काही भाई,
आपल्याला काय फक्त बोलून निघून जाण्याची घाई..!
वाढत चालली घोटाळ्यांची मांदीयाळी,
दिल्लीच्या वरदहस्ताने भाजली जाते पोळी,
साम- दाम- दंड भेद हिच विचारांची झोळी,
आपल्याला काय फक्त बोलून निघून जाण्याची घाई..!