लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असून त्याअनुषंगाने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. उमेदवार निश्चिती, जागावाटपाच्या चर्चा यावर सर्वपक्षीय नेत्यांची चर्चा, बैठका होत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सत्ताधारी भाजपाला सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. केंद्रात सत्तेत असताना वेगवेगळ्या राज्यांमधील विरोधी पक्षांच्या सरकारांना पाडण्यासाठी भाजपाकडून वारंवार प्रयत्न केले जात असल्याचा दावा विरोधी पक्षांकडून केला जात आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे आमदार अजित पवार यांनी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ देशाच्या संसदेतला असून लोकसभेत अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना केलेल्या भाषणातली ही एक क्लिप आहे. या व्हिडीओमध्ये अटल बिहारी वाजपेयी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या काळात घडलेला एक प्रसंद लोकसभेत सांगत असून त्यानंतर देशातली ही परंपरा कायम राहायला हवी, अशी भूमिका अटल बिहारी वाजपेयी यांनी या भाषणात मांडल्याचं दिसत आहे.

काय म्हणाले होते अटल बिहारी वाजपेयी?

अटल बिहारी वाजपेयींनी त्यांच्या लोकसभेतील एका भाषणादरम्यान नरसिंह राव यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना दिलेल्या सन्मानाचा संदर्भ दिला होता. जिनिव्हा परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी नरसिंह राव यांनी पंतप्रधान असताना तत्कालीन लोकसभा विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांना पाठवलं होतं. त्याचा संदर्भ देत अटल बिहारी वाजपेयींनी देशाची परंपरा कायम राहायला हवी, असं आवाहन केलं होतं.

“त्या काळात पंतप्रधान नरसिंह राव यांनी भारताची बाजू जिनिव्हामध्ये मांडण्यासाठी मला विरोधी पक्षनेता म्हणून पाठवलं होतं. पाकिस्तानी मला पाहून आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले की हे कुठून आले? हे इथे कसे आले? कारण त्यांच्याकडे विरोधी पक्षनेता अशा राष्ट्रीय कार्यामध्येही सहकार्य देण्यासाठी तयार नसतो. तो नेहमीच सरकार पाडण्याच्याच कामी लागलेला असतो. ही आपली परंपरा नाही. ही आपली प्रकृती नाही”, असं अटल बिहारी वाजपेयी लोकसभेत म्हणाले होते.

“सत्तेचा खेळ होत राहील, देश जिवंत राहायला हवा”

“माझी अशी इच्छा आहे की ही परंपरा कायम राहायला हवी. सत्तेचा खेळ चालतच राहील. सरकारं येत राहतील – जात राहतील. पक्ष बनत राहतील, तुटत राहतील. पण हा देश जिवंत राहायला हवा, या देशातली लोकशाही जिवंत राहायला हवी”, असं आवाहन अटल बिहारी वाजपेयी यांनी केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

जितेंद्र आव्हाडांनी या व्हिडीओसह तीन शब्दांती पोस्ट केली असून त्यात “यही सच है”, अशी टिप्पणी केली आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी हा अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्ष व त्यांच्या सहकारी मित्रपक्षांना टोला लगावल्याचं बोललं जात आहे.