Amol Kolhe On Ajit Pawar : राज्यात विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर आल्यामुळे राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या आधी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी महाराष्ट्रात दौरे सुरु केले आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत करत सभा, बैठका आणि मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. यावेळी होणाऱ्या वेगवेगळ्या संभामधून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे.

यातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीसंदर्भात मोठं निधान केलं. “मी ७ ते ८ वेळा निवडणूक लढलो, आता मला रस राहिला नाही”, असं अजित पवार यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आलं. यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर नाव न घेता खोचक टीका केली आहे. “सेनापतीच गळपटला असेल सैन्यांनी लढायचं कसं? हा त्यांच्यामधील नेत्यांना प्रश्न पडला असेल”, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “मी आता ठरवलंय, शरद पवारांबाबत…”, अजित पवार नेमकं काय म्हणाले?

अमोल कोल्हे काय म्हणाले?

“चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे, असं म्हणतात. मात्र, इथे अजित पवार हे जवळपास २२ वर्ष सत्तेत होते. त्यामुळे ते ६६ टक्के सत्तेत आणि ३३ टक्के विरोधात अशी अजित पवार यांची कारकीर्द राहिलेली आहे. मात्र, आता आता पराभव समोर दिसत असल्यामुळे की महायुतीत त्यांची घुसमट होत आहे? अजित पवारांबरोबर जाण्यासाठी ज्या-ज्या लोकांनी शरद पवारांचं बोट सोडलं. त्या प्रत्येकाची मला चिंता वाटते. कारण सेनापतीच गळपटला तर सैन्यांनी लढायचं कसं? हा प्रश्न आता त्यांना नक्कीच पडला असेल”, अशी खोचक टीका अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांवर केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार काय म्हणाले होते?

पुण्यामध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत असताना अजित पवारांना जय पवार यांच्या उमेदवारीबाबत कार्यकर्ते मागणी करत आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी या प्रश्नाचे उत्तर देत असताना ते म्हणाले, “शेवटी लोकशाही आहे. मला तरी निवडणूक लढण्यात रस नाही. मी तिथे सात-आठ वेळा निवडणुकीला उभा राहिलो आहे. जनतेचा कौल असेल त्याप्रमाणे आमच्या पक्षाचे संसदीय समिती त्याचा निर्णय घेईल. स्थानिक कार्यकर्ते आणि पक्ष संघटना जो निर्णय घेईल, तो आम्ही मान्य करू.”