Amol Kolhe On Jayant Patil : विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. विधानसभेसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच राज्यभरात वेगवेगळ्या मतदारसंघात सभा आणि मेळावे सुरु आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांमध्ये जागावाटपाबाबत खलबतं सुरु आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरु आहेत. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? याबाबत अद्याप महाविकास आघाडीने चेहरा घोषित केलेला नाही. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा रंगली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसचं (शरद पवार) सर्वोच्च पद हे जयंत पाटील यांच्याकडे असेल”, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. ते सांगलीतील शिराळा येथे शिवस्वराज्य यात्रेत बोलत होते.

अमोल कोल्हे काय म्हणाले?

“ज्यांनी हाताला धरून काहींना मोठं केलं. डोक्यावर सावली धरली. मात्र, असे पक्ष रातोरात फोडले गेले. निष्ठा बदलल्या गेल्या. २०२२ मध्ये शिवसेना फोडण्यात आली. त्यानंतर २०२३ मध्ये शरद पवार यांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आला. त्यामुळे संपूर्ण देशाच्या मनात एकच प्रश्न उपस्थित झाला. ईडी, सीबीआयच्या दबावाला बळी पडले का? आता सध्या राज्यातील ८० मतदारसंघात अडचणी निर्माण झाल्या. ज्या आमदारांनी कोणत्या न कोणत्या प्रलोभनाला बळी पडून भूमिका बदलली, निष्ठा बदलली, आता त्या आमदारांच्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडला असेल की आपल्या आमदाराने गद्दारी केली मग आता बॅनर्सवर दमदार आमदार लिहायचं की गद्दार आमदार लिहायचं?”, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेनेवर (शिंदे) हल्लाबोल केला.

हेही वाचा : Neelam Gorhe: ‘कधीही ब्रेकिंग न्यूज मिळू शकेल’, शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांचं अजित पवार गटाबाबत सूचक विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आता तुमच्यावरील जबाबदारी सर्वोत मोठी आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत अजून दोन बैठका बाकी आहेत. त्यामुळे मी आता काही म्हणत नाही. मात्र, तु्म्हाला माहिती आहे की, सांगली जिल्ह्यात त्या पदाच्या बाबतीत खूप मोठा बॅकलॉक झालेला आहे. पण मग तुमच्या सर्वांच्या खाद्यांवर जबाबदारी येते. सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील प्रत्येक उमेदवार हा आमदार झालाच पाहिजे, अशी भूमिका जर तुम्ही सर्वांनी घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातील सर्वोच्च पद जे असेल ते जयंत पाटील यांच्याकडेच असेल. कारण महाराष्ट्रात जेव्हा पक्षांची वाताहत होत होती. पक्षाचं काय होणार? हा प्रश्न पडला होता. पण मला अभिमान वाटतो की मी अशा नेतृत्वाच्या हाताखाली काम करतो जे नेतृत्व सुसंस्कृत आहे”, असं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.