राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. राज्यात विरोधी पक्षात आणि केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनी केलेल्या विकासांच्या कामाचं शरद पवार यांनी कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर सत्तेचा वापर विकासाच्या कामांसाठी कसा करावा हे नितीन गडकरी यांच्याकडून शिकलं पाहिजे अशा शब्दांत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. नगरमध्ये महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. यावेळी शरद पवार बोलत होते. नगर जिल्ह्यातील ४ हजार ७५ कोटी रुपये खर्चाच्या ५२७ किमी. लांबीच्या २५ महामार्गांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा शनिवारी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला.

“मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो कारण मला नितीन गडकरी अहमदनगरमध्ये गेल्या अनेक काळापासून प्रलंबित असणारे प्रश्न सोडवणाऱ्या अनेक प्रकल्पांचं उद्घाटन करणार असल्याचं मला सांगण्यात आलं. तसंच मी उपस्थित राहावं अशी त्यांची इच्छा होती,” असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “अनेकदा भुमीपूजन झाल्यानंतर काहीच काम होत नाही. पण जेव्हा नितीन गडकरींच्या हातात प्रकल्प असतो तेव्हा काही दिवसांतच काम सुरु झाल्याचं पहायला मिळतं”. लोकप्रतिनिधी देशाच्या विकासासाठी कशा पद्धतीने काम करु शकतो याचं नितीन गडकरी उत्तम उदाहरण आहेत असंही यावेळी ते म्हणाले.

“मला आठवतं नितीन गडकरी यांच्या रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग वाहतूक मंत्रायलयाची जबाबदारी येण्याआधी जवळपास पाच हजार किमी रस्त्याचं काम झालं होतं. पण त्यांनी मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आतापर्यंत १२ हजार किमी काम झालं आहे,” अशी माहिती शरद पवारांनी दिली.

मला रस्त्यानं प्रवास करायला आवडतं
यावेळी बोलताना शरद पवारांनी आपल्याला रस्त्याने प्रवास करायला आवडत असल्याचं सांगितलं. “देशाच्या अनेक राज्यांमध्ये मला कामानिमित्त जावं लागतं. गाडीनं प्रवास करण्यात मला स्वत:ला आनंद मिळतो. कारण त्यामुळे रस्ते बघायला मिळतात, आजूबाजूच्या शेतातलं पीक बघायला मिळतं. म्हणून मी शक्यतो रस्त्यांनी प्रवास करण्याचा प्रयत्न करतो”, असं ते म्हणाले.

गडकरी साहेबांची कृपा…
दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवारांनी इतर राज्यांमध्ये त्यांना येत असलेल्या अनुभवाविषयी सांगितलं. “देशाच्या कोणत्याही राज्यात गेल्यानंतर त्या ठिकाणचे उत्तम रस्ते बघायला मिळतात. तिथले खासदार, मंत्री, अधिकाऱ्यांकडे हा विषय काढला की ते म्हणतात ‘ही गडकरी साहेबांची कृपा आहे’. त्यामुळे लोकप्रतिनिधी सत्तेचा अधिकार हातात आल्यानंतर त्याचा उपयोग देशाच्या उभारणीसाठी कसा करू शकतो, याचं उत्तम उदाहरण गडकरींनी दाखवलं आहे”, असं शरद पवार म्हणाले.

नव्या साखर कारखान्यांना परवानगी नको – गडकरी
देशात यापुढे नवीन साखर कारखान्यांना परवानगी नको तसेच लवकरच संपूर्णपणे ‘इथेनॉल’वर चालणाऱ्या वाहनांचे धोरण स्वीकारले जाईल, असे गडकरी यांनी सांगितले. तर साखर कारखान्यांनी इथेनॉलपासून ‘हायड्रोजन गॅस’च्या निर्मितीत उतरावे असा सल्ला शरद पवार यांनी या वेळी दिला.

गडकरी म्हणाले, की देशात पेट्रोलमध्ये सध्या २० टक्के इथेनॉलच्या वापरास परवानगी दिली आहे. आता पूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचे धोरण स्वीकारले पाहिजे. येत्या दोन महिन्यांत त्या संदर्भात न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केवळ साखरेवर अवलंबून राहण्याचे दिवस आता संपले असल्याचे सांगत गडकरी म्हणाले, की कारखान्यांसाठी आता उसाचा रस किंवा साखरेपासूनच इथेनॉल निर्मितीचे धोरण स्वीकारले पाहिजे. साखर कारखान्यांनी ‘इथेनॉल’चे पंप सुरू करावेत. उद्योगांनी वाहनात ‘फ्लेक्स इंजिन’चे तंत्रज्ञान अमलात आणावे. केंद्र सरकार ‘इथेनॉल’साठी शेतकऱ्यांशी करार करण्यास तयार आहे. तसेच देशात यापुढे नवीन साखर कारखान्यांना परवानगी नको असेही स्पष्ट मत त्यांनी नोंदवले.