अलिबाग– राज्यस्थापनेपासून सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्रीपद तसेच वित्त व नियोजन मंत्रीपदावर काम करण्याचा विक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी केला आहे. हा विक्रम कोणी मोडू शकणार नाही. याचा अर्थ असा नाही की त्यांनी कायम उपमुख्यमंत्रीपदावरच काम करावे, ते राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत ही आमचीही इच्छा आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. ते माणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, स्नेहल जगताप आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे उपस्थित होते. शिवसेना शिंदे गटाचे नेते राजीव साबळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेशा निमित्ताने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यात १९७८ ला राज्यात पहिल्यांना उपमुख्यमंत्री पद अस्तित्वात आले. तेव्हा पासून आजतागायत सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा बहुमान अजित पवारांना मिळाला, राज्याचे सर्वाधिक अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रमही त्यांनी केला. जो विक्रम कोणी मोडू शकणार नाही, याचा अर्थ आम्ही तेवढ्यावर सिमीत आहोत असे नाही. ते राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत हे आमच्याही मनात आहे असल्याचे ते म्हणाले.
राजकीय अपरिहार्यता म्हणून आम्ही एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र महायुतीत असलो तरी शिव, शाहू फुले आंबेडकरांचा विचार आम्ही सोडलेला नाही. धर्मनिरपेक्षतेचा विचार न सोडल्यानेच आज काँग्रेसच्या विचारधारेत तयार झालेले अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल होत असल्याचे मत तटकरे यांनी यावेळी मांडले. आज देशाच्या वर्तुळात अजित पवार काय करत आहेत असे विचारणारे अनेक जण भेटतात.
स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणूका महायुती म्हणून एकत्र लढाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी एक समन्वय समिती स्थापन कऱण्यात आली आहे. योग्य वेळी त्याबाबत निर्णय होईल, प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. पण रायगड आणि रत्नागिरीतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्याचे काम मी करेन असा विश्वास तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
रायगडच्या राजकारणावर एकेकाळी पकड असलेले अंतुले, जगताप, साबळे आणि ठाकूर कुटूंब राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचार धारेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे भविष्यातील राजकारणाची दिशा कशी असेल हे यातून स्पष्ट होत आहे. श्रध्दा आणि सबुरीच्या मार्गाने वाटचाल करू असे मतही तटकरे यांनी यावेळी व्यक्त केले.