लातूर : राज्याच्या वैद्याकीय महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेच्या ३० टक्के मुले लातूरमध्ये ‘ नीट’ची परीक्षेची तयारी करणारी असतात. त्यामुळे लातूरमध्ये प्रवेशासाठी गुणवत्ता वरच्या दर्जाची. परिणामी शिक्षण क्षेत्राला पूरक अशी येथील बाजारपेठ मोठी. या विद्यार्थ्यांमुळे गणित, पदार्थ विज्ञान, जीवशास्त्र, रसायन शास्त्र या पुस्तकांची उलाढाल सुमारे ३० कोटी रुपयांची.
विद्यार्थ्याला पदार्थ विज्ञान, जीवशास्त्र व रसायनशास्त्र या तीन विषयांची किमान चार हजार रुपयांची पुस्तके खरेदी करावे लागतात. याशिवाय ‘सीबीएससी’ अभ्यासक्रमाची सुमारे पंधराशे रुपयांची , ‘एनसीआरईटी’ची पंधराशे रुपये तसेच ज्या शिकवणी वर्गात शिकत असतील तर तिथे किमान सहा हजार रुपये तर मोठ्या शिकवणी वर्गात दहा ते पंधरा हजार रुपये पुस्तकासाठी खर्च करावे लागतात . राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची दोन हजार रुपयांची पुस्तकेही लागतात. अभ्यासक्रमातील या पुस्तकांबरोबरच ऑनलाइन सराव चाचण्यांची किंमत वेगळी. त्यासाठी पाच हजार रुपये पासून ३५ हजार रुपयांपर्यंत पालकांचा खर्च होतो. लातूर शहरात नामांकित महाविद्यालयाबरोबरच देशातील जवळजवळ सर्व प्रमुख शिकवणी वर्गाच्या शाखा लातूरात कार्यरत आहेत.
नवे प्रकाशकही
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय अशा अनेक प्रकाशन संस्था कार्यरत आहेत . सुमारे दीडशे प्रकाशन संस्था या व्यवसायात गुंतलेल्या आहेत. लातूरातील खासगी शिकवणी वर्ग स्वत:ची पुस्तके प्रकाशित करतात. देशातील नामवंत प्रकाशन संस्थेसोबत भागीदारी करून त्यांच्याकडूनच स्वत:च्या नावाने पुस्तके प्रकाशित केली जातात.
पंचवीस हजार विद्यार्थी
सरासरी २५ ते ३० हजार विद्यार्थी या शिकवणी वर्गात प्रवेशित होतात. गतवर्षी नीट परीक्षेत २४ हजार ७०० विद्यार्थी लातूर परीक्षा केंद्रावरून परीक्षेत बसले होते. तर जेईई परीक्षेसाठी ४५०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. संदर्भित पुस्तकांचा वर्षभराचा खर्च २५ हजार रुपये होतो. जे विद्यार्थी अधिक मेहनत घेऊन अनेक पुस्तकांचा संदर्भ चाळतात त्यांच्यासाठी रक्कम अधिक लागते.
विज्ञान शाखेचे विद्यार्थी परीक्षेची तयारी करताना अधिकाधिक माहिती मिळावी यासाठी एका विषयाची चार तरी पुस्तके वर्षभरात अभ्यासतात हा आपला अनुभव आहे.
प्रा. भगवान तांबळकर, सेवानिवृत्त पदार्थ विज्ञान प्रमुख, दयानंद विज्ञान महाविद्यालय
नीट व जेईई अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी विद्यार्थी प्रारंभापासून पुस्तके खरेदी करतात. काही प्रमाणात राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाची पुस्तके विकली जातात मात्र केंद्रीय अभ्यासक्रमाची पुस्तके मोठ्या प्रमाणावर विकली जातात.
रवी जोशी, विक्रेते लातूर
दरवर्षी अकरावी बारावीचे विद्यार्थी शिकण्यासाठी पंधरा हजारापासून २५ हजार रुपयांपर्यंत पुस्तकावर खर्च करतात. लातूरची शैक्षणिक बाजारपेठ त्यामुळेच देशात गाजत असून राज्यातील पहिल्या दोन क्रमांकात लातूरचे नाव घेतले जाते आहे. – उमाकांत होनराव, शिकवणी वर्गचालक