पेट्रोल, डिझेल, व रॉकेल यामधली भेसळ, अंमली पदार्थासंबंधित विषय,  दारूमध्ये होणारी भेसळ, या व अशा अनेक गुन्ह्यांचा तपास पुढच्या वर्षी पासून लवकर होऊ शकेल. न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय याने सध्या चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे व ठाणे येथे मिनी लॅब सुरू केले आहेत. पुढच्या महिन्याच्या मध्यावर सोलापूरला सुद्धा अशीच एक प्रयोगशाळा सुरू होईल. ठाण्यातल्या प्रयोगशाळेचं उद्घाटन सोमवारी झालं.

सध्या संचलनालयाची एक राज्य पातळीवरची प्रयोगशाळा मुंबई आहे तर महाराष्ट्रात इतरत्र सात ठिकाणी अशा लॅबरोटरीज आहेत  . नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर आणि औरंगाबाद  या ठिकाणी या लॅब आहेत.

“तपासणीसाठी येणाऱ्या एकूणच केसेसमध्ये बायोलॉजी व टॉक्सिकॉलॉजी या दोन विभागांचा वाटा मोठा आहे. साधारणतः बायोलॉजीमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, लैंगिक अत्याचार, अशा गुन्ह्याशी संबंधित पुरावे म्हणजे रक्त वगैरे तपासणीसाठी पाठवण्यात येते. तर, टॉक्सिकॉलॉजी मध्ये मृत्यूचं कारण ठरवण्यासाठी व्हिसेरा, स्टमक वॉश किंवा रक्त यांचे नमुने पाठवले जातात. या पाच नवीन छोट्या मिनी लॅब सुरू झाल्यामुळे या गुन्ह्यांची तपासणी पटकन करता येईल व पोलिसांना या गुन्ह्यांसंदर्भातले रिपोर्टही लवकर मिळतील. नाहीतर ही प्रक्रिया फार वेळखाऊ होते,” असे का गृह खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

“पुढच्या वर्षी या पाचही मिनी लॅब मध्ये आम्ही दोन नवे विभाग सुरू करत आहोत. त्यातला एक असेल प्रोहिबिशन अँड एक्साईज. इथे उत्पादन शुल्क खात्याशी निगडित गुन्हे, म्हणजे दारू व स्पिरिट मधील भेसळ वगैरे त्याच्याशी संबंधित नमुने तपासले जातील. दुसरा म्हणजे जनरल अँड अॅनालिटिकल विभाग जात, पेट्रोल, डिझेल, केरोसीन व अंमली पदार्थ याच्या संदर्भात तपासणी केली जाईल. त्यामुळे पोलीस व चौकशी यंत्रणांना याबाबत चे अहवाल लवकर मिळतील. त्याच बरोबर आम्ही ठाण्याच्या  प्रयोगशाळेत सायबर गुन्ह्यांच्या तपासणीसाठी एक नवा विभाग सुरू करू. याचे कारण असे की महाराष्ट्रात नोंदवल्या जाणाऱ्या अशा सायबर गुन्ह्यांमध्ये ठाणे व पालघर जिल्ह्यांचे प्रमाण बऱ्यापैकी वर आहे. आजपर्यंत साधारणपणे पाच हजार गुन्हे संबंधी अहवाल प्रलंबित आहेत. त्याउलट बायोलॉजी, टॉक्सिकॉलॉजी, व इतर विभागांमध्ये अहवाल साधारणपणे तीन महिन्याच्या आत सहजच मिळून जातो,” असं या सूत्रांनी सांगितले.