शरद पवारांच्या ‘संभाजीराजे असोत की, आणखी कुणी…’ वक्तव्यावरुन निलेश राणे संतापून म्हणाले, “भूमिका बदलली नाही ते पवार…”

शिवसेनेकडून दुसऱ्या जागेसाठी चाचपणी सुरु असतानाच संभाजीराजेंनी शिवसेनेसहीत सर्वच राजकीय पक्षांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.

Nilesh Rane Sharad Pawar
ट्विटरवरुन निलेश राणेंनी दिली प्रतिक्रिया (फाइल फोटो)

राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना उमेदवाराला मतदान करण्यात येणार असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (२१ मे) पत्रकारांशी बोलताना जाहीर केली. शिवसेना सांगेल त्या उमेदवाराला अतिरिक्त मतदान केले जाईल. मग तो उमेदवार संभाजीराजे छत्रपती किंवा अन्य कोणी असो, त्यालाच राष्ट्रवादी मतदान करेल असं पवार यांनी स्पष्ट केले. मात्र पवारांच्या या वक्तव्यावरुन आता भाजपा प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणेंनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षांवर निशाणा साधलाय.

नक्की वाचा >> “ज्या पक्षाने मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली, तुमच्याकडे…”; शिवसेना प्रवेशासंदर्भात संभाजीराजेंना निलेश राणेंचा सल्ला

“संभाजीराजे असोत की, आणखी कुणी…”
राज्यसभेच्या सहापैकी दोन जागा लढविण्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. एका जागेवर संजय राऊत यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर दुसऱ्या जागेसाठी चाचपणी सुरु असतानाच संभाजीराजेंनी शिवसेनेसहीत सर्वच राजकीय पक्षांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे. अशातच अपक्ष म्हणून संभाजीराजेंना मतदान करणार की शिवसेनेला या प्रश्नावर पवारांनी उत्तर देताना, “संभाजीराजे असोत की, आणखी कुणी, मतं शिवसेनेच्याच उमेदवाराला,” असं वक्तव्य केलं. याच वक्तव्यावरुन निलेश राणेंनी पवारांवर टीका केलीय.

पवारांवर साधला निशाणा
शरद पवारांवर निशाणा साधताना पवार कधी शब्द पाळत नाही असा टोला नितेश यांनी लागवलाय. “हे होणारच होतं… पवार साहेब आणि शब्द पाळला होऊ शकत नाही. भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले?? राजे जर शिवसेनेसोबत जाणार तर संजय (राऊत) दुसऱ्या सीटवर आहे ज्यांनी मराठा मुक मोर्चाची मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली होती, विसरू नका,” असं ट्विट नितेश राणेंनी केलंय. शरद पवार यांनी यापूर्वी संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासंदर्भात राष्ट्रवादी अनुकूल असल्याचं सांगितल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी हे वक्तव्य केलंय.

शिवसेना प्रवेशास नकार…
राज्यसभेच्या उमेदवारीकरिता कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अट घातली असली तरी शिवसेनेत प्रवेश करण्याची संभाजीराजे अनुकूल नाहीत. महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. 

शिवसेना आणि संभाजीराजेमंध्ये काय संवाद झाला?
राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचे जाहीर केलेले कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश करावा. त्यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप संभाजीराजे यांना देण्यात आला होता. शिवसेनेच्या एका मंत्र्याने संभाजीराजे यांची भेटही घेतली. संभाजीराजे हे शिवसेनेत प्रवेश करण्यास तयार नाहीत. याउलट महाविकास आघाडीकडील अतिरिक्त मते आपल्याला द्यावीत, असा प्रस्ताव त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादीकडे दिला आहे. 

संभाजीराजेंची अडचण काय?
राज्यसभेच्या सहापैकी दोन जागा लढविण्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. एका जागेवर संजय राऊत यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. भाजपाच्या वतीने सहा वर्षांपूर्वी राज्यसभेवर संभाजीराजे यांची नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हाही संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणूनच सहा वर्षे खासदारकी भूषविली. या वेळीही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. पण अपक्ष लढल्यास विजयाचे गणित जुळणे अशक्य आहे. भाजपाकडे २२ अतिरिक्त मते असली तरी अतिरिक्त २० मते मिळविण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल.

मतदानाबद्दल पवार नेमकं काय म्हणाले?
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. आमच्याकडे असलेली अतिरिक्त मते शिवसेनेच्या उमेदवाराला देण्यात येतील, असा शब्द गेल्या निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आला होता, असे शरद पवार यांनी सांगितले.

शिवसेनेनं केलेली मदत
“दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये आमचा एकच उमेदवार निवडून येऊ शकत होता. त्यावेळी दुसरा उमेदवार मीच असल्याने आम्ही ती जागा मागून घेतली. त्यामळे मी आणि फौजिया खान खासदार झालो होतो. पुढच्या वेळी अधिकची एक जागा आम्हाला मिळाली पाहिजे अशी मागणी शिवसेनेने केली होती,” असं पवार म्हणाले.

सहावा उमेदवार विजयी होऊ शकेल
“शिवसेनेच्या मागणीनुसार आता आमचा एक उमेदवार विजयी झाल्यानंतर अतिरिक्त मते शिवसेनेच्या उमेदवाराला देण्यात येतील. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांकडे असलेल्या मतांच्या बळावर सहावा उमेदवार विजयी होऊ शकेल,” असा विश्वासही पवारांनी व्यक्त केलाय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nilesh rane says sharad pawar not do what he says scsg

Next Story
Petrol-Diesel Rate Today : इंधनांच्या दरात सातत्याने घसरण; जाणून घ्या आज किती रुपयांनी कमी झाली किंमत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी