वाहतकू नियम आणि दंडाच्या रकमेत बदल झाल्याने महामार्गांवर प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागत आहे. अशातच महामार्गावरील वेगमर्यादेच्या जुन्या नियमांचाही फटका प्रवाशांना बसत आहे. यासाठी प्रवाशांना अगदी २००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागत आहे. यावर आता केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही भाष्य केलंय. नितीन गडकरींनीही प्रवाशांना भराव्या लागणाऱ्या दंडाबाबत सरकारच्या चुका मान्य केल्या आहेत. ते गुरुवारी (१४ जुलै) औरंगाबादमध्ये आले असताना माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितीन गडकरी म्हणाले, “आम्ही रस्ते चांगले बांधले, मात्र वाहन वेगाचे नियम तेच ठेवल्यामुळे लोकांना उगाच दंड होत आहे.त्यामुळे यावर राज्य सरकार आणि भारत सरकार मिळून आम्ही लवकरच कायद्यात बदल करून सुधारणा करू. जेणेकरून ही अडचण येणार नाही.”

“वेगाचे नियम जुनेच आहेत”

“आपल्या संविधानात तीन सुची आहेत. राज्य, केंद्र व राज्य-केंद्र सुची. आपल्याकडे अडचण अशी आहे की, आपण नवीन ८ मार्गिका, १० मार्गिका असणारे महामार्ग बांधत आहोत, रस्त्याच्या रुंदीत आपण सुधारणा केली आहे. मात्र, वेगाचे नियम जुनेच आहेत. हे नियम बदलवण्यासाठी राज्य सरकार आणि आम्ही मिळून काम करत आहोत,” अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

“नव्या महामार्गांसाठी वाहनांच्या वेग मर्यादेच्या नियमात सुधारणा”

“रस्त्यावरील वाहन वेगाची निश्चिती करण्यात राज्य व केंद्र सरकार दोघांचेही अधिकार आहेत. त्यामुळे बंगळुरू येथे होणाऱ्या बैठकीत सामाईक ठराव केला जाणार आहे. त्यात नव्या महामार्गांसाठी वाहनांच्या वेग मर्यादेच्या नियमात सुधारणा केली जाईल,” असंही नितीन गडकरींनी नमूद केलं.

हेही वाचा : एकनाथ शिंदेंना असं अमृत पाजलंय की त्यांची गाडी कुठेही थांबणार नाही- नितीन गडकरी

“पुणे-औरंगाबाद अंतर केवळ अडीच तासांमध्ये पूर्ण होणार”

नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद-पुणे २६८ किलोमीटर विशेष महामार्ग काम सुरू होणार आहे. हा सहा पदरी रस्ता सुरू होईल. त्याला पुणे-बंगलोर, अहमदनगर शहरांशी जोडले जाईल. यामुळे पुणे-औरंगाबाद अंतर केवळ अडीच तासांमध्ये पूर्ण करणं शक्य होईल. औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या कामात अडचणी होत्या. मात्र, आता हा रस्ता मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होईल.औरंगाबाद-वाळूज रस्त्यावर डबल डेकर पुल तयार होईल. जुन्या पुलांचा अभ्यास करून अतिक्रमण काढू, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari comment on penalty for passengers for exceeded vehicle speed in aurangabad pbs
First published on: 14-07-2022 at 15:46 IST