राजकीय वादावरून नितीन गडकरींनी टोचले राज्यातील नेत्यांचे कान; म्हणाले…

मलाही अनेक गोष्टी बरोबर वाटल्या नाही, तेव्हा…

राज्य करोना संकटात आहे. दररोज करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहेत. तर दुसरीकडं राजकीय वादविवाद झडत असल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर भाजपा नेत्यांकडून प्रश्न उपस्थित करून टीका केली जात आहे. त्याला सत्तेतील पक्षांकडून उत्तरं दिली जात आहे  या राजकीय रणधुमाळीवरून भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खडेबोल सुनावत राज्यातील कान टोचले आहेत.

देशात आणि राज्यात निर्माण झालेल्या करोनाच्या संकटाला तोंड देत असताना सरकारची नितीन गडकरी यांनी भूमिका मांडली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना राज्यातील राजकीय कुरघोड्या, घडामोडी आणि आरोपप्रत्यारोपांविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गडकरी यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना नेत्यांनाही संयमानं परिस्थिती हाताळण्याचा सल्ला दिला.

नितीन गडकरी म्हणाले,”आपल्या सगळ्यांचं हे कर्तव्य आहे. सगळ्या राजकीय पक्षांचं आणि नेत्यांचं कर्तव्य आहे की, प्रथम आपण भारतीय आहोत आणि आपल्या देशाची लढाई सुरू आहे. देशानंतर मग आपले पक्ष आणि आपलं राजकारण आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशातील गरीब जनता अत्यंत कठीण स्थितीमध्ये आज करोनाशी लढते आहे. करोनाची लढाई जिंकल्यानंतर होणारी आर्थिक लढाई त्यापेक्षा मोठी आहे. तेव्हा सगळ्यांनी आता विकासाच्या बाबतीत राजकारण करू नये. राजकारण निवडणुकीच्या १५-२० दिवसांमध्ये प्रत्येकालाच करावं लागेल. लोकशाही आहे. प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. जनतेच्या न्यायालयात लढाई जिंकायची असेल, तर आपली बाजू मांडावी लागते. बोलावं लागतं, त्याला काही हरकत नाही. पण, राजकारणापेक्षा राष्ट्रकारण, विकासकारण महत्त्वाचं आहे. सत्ताकारण आणि विकासकारण यात विकासकारण महत्त्वाचं आहे. जेव्हा राष्ट्र संकटात आहे, तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून याचा प्रतिकार केला पाहिजे. त्यामुळे यात राजकारण न करण्याची जाणीव सर्वच पक्षांच्या जबाबदार आणि संवेदनशील नेत्यांनी ठेवली पाहिजे,” असं आवाहन गडकरी यांनी केलं.

मलाही अनेक गोष्टी बरोबर वाटल्या नाही, तेव्हा…

“माझ्यासमोरही काहीवेळा अनेक प्रसंग असे आले की काही गोष्टी बरोबर नाही वाटल्या. तेव्हा मी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव यांच्याशी फोन करून बोललो. त्यांना सूचना केल्या. त्यांनीही मला काही गोष्टी सूचवल्या. एकमेकांच्या चुका होऊ शकतात, त्या आपण एकमेकांशी बोलून लक्षात आणून देऊ शकतो. पण, त्या सार्वजनिक रीत्या बोलून, त्यावर वादविवाद करून राजकीय चर्चा टिव्हीवर करणं ही गोष्ट टाळणं फार महत्त्वाची आहे. कारण ही राजकारण करण्याची वेळ नाही. महाराष्ट्रातील नेते तर जास्त सुसंस्कृत आहेत,” असं सांगत गडकरी यांनी राज्यातील नेत्यांना एकजुटीनं करोनाविरोधात लढा देण्याचं आवाहन केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nitin gadkari slam to political leader of maharashtra bmh

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना