नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून झालेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहित विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. यामुळे काँग्रेसमधील खदखद चव्हाट्यावर आली आहे. थोरातांच्या राजीनाम्यावर राज्यभरातून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. अशातच प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (देशमुख) यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर सूचक मत व्यक्त केलं. ते मंगळवारी (७ फेब्रुवारी) संगमनेरमध्ये (अहमदनगर) येथे थोरातांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कीर्तनात बोलत होते.
निवृत्ती महाराज इंदुरीकर म्हणाले, “बाळासाहेब थोरात यांचा १०० वा वाढदिवसही आपल्याकडून व्हावा यासाठी आपण सगळ्यांनी प्रार्थना करावी. क्षेत्र कोणतंही असो, आपला माणूस हा आपला स्वाभिमान असतो. बाळासाहेब थोरातांनाही एक वाक्य बरोबर लागू होतं ते म्हणजे, जे दगडं घाव सहन करतात तीच दगडं मूर्तीसाठी उपयोगी पडतात.”
“कोणत्याही दगडाची मूर्ती होत नाही. जी दगडं घाव सहन करतील तीच मूर्तीसाठी वापरली जातात. ज्यांच्यात घाव सहन करण्याची ताकद आहे त्यांना यश निश्चित आहे,” असंही इंदुरीकर महाराजांनी नमूद केलं.
व्हिडीओ पाहा :
हेही वाचा : “तुम्ही बाळासाहेब थोरातांना फोन करणार का?”, नाना पटोले म्हणाले, “आमचं त्यांच्याबरोबर…”
बाळासाहेब थोरात काय म्हणाले होते?
काँग्रेसमधील राजकारणावर बाळासाहेब थोरात म्हणाले होते, “विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठं राजकारण झालं. सत्यजीत या निवडणूक चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र, जे राजकारण झालं, ते व्यथित करणारं होतं. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. हे पक्षीय राजकारण आहे. त्यामुळे यावर बाहेर बोललं पाहिजे, या मताचा मी नाही. याबाबत पक्षातील नेत्यांबाबत बोलणं झालं असून योग्य तो निर्णय होईल.”
“गेल्या काही दिवसांत काही लोकांना आपल्याबद्दल गैरसमज पसवण्याचं काम केलं. मात्र, काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे आणि आपली पुढेची वाटचालही याच विचाराने होणार आहे,” असंही ते म्हणाले होते.
“महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर मोठ्या प्रमाणात राजकारण होतं आहे. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे, त्यांना अडचणी आणलं जात आहे, त्यांचे उद्योग बंद पाडण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, आपण अनेकदा संघर्ष केला आहे. संघर्षातूनच आपण मोठं झालो आहे. त्यामुळे या संघर्षातून आपण नक्कीच बाहेर येऊ,” असा विश्वास थोरातांनी व्यक्त केला होता.