हिंगोली : येथील शासकीय जिल्हा रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी सकाळी बायोमेट्रिकवर हजेरी नोंदवून गायब होतात, तर काही मन मर्जीप्रमाणे उशिरा येऊन लवकर जातात, अशा तक्रारी वाढल्यानंतर अधिष्ठांतानीच अचानक प्रत्यक्ष भेट देण्याचा उपाय अवलंबला. त्यांच्या भेटीत काही अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणा उघड झाला. बेशिस्त आठ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

हिंगोलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिकवर हजेरी नोंदवणे बंधनकारक आहे. तसेच हजेरी नोंदवल्यानंतर रुग्णालयाच्या १०० मीटर परिसरात थांबणे क्रमप्राप्त आहे. परंतु, काही अधिकारी व कर्मचारी सकाळी रुग्णालय परिसरात येऊन स्वप्रतिमा (सेल्फी) काढून हजेरी नोंदवितात आणि गायब होतात, तर काही उशिरा येऊन लवकर जात असल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या या बेशिस्तीबद्दल अनेक तक्रारी पुढे येत होत्या. याचा त्रास रुग्ण व नातेवाइकांना सहन करावा लागत होता. तक्रारीचे प्रमाण वाढत गेल्यानंतर बेशिस्त कर्मचाऱ्यांना सूचना देण्यापलीकडे कोणतीच कार्यवाही होत नव्हती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन महिन्यांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कार्यभार आरोग्य विभागाकडून वैद्यकीय महाविद्यालयाकडे वर्ग झाला व या रुग्णालयाची सूत्रे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल यांच्याकडे आली. अधिष्ठाता डाॅ. मुंगल यांनी जिल्हा रुग्णालयात अचानक भेटी देण्याचे सत्र सुरू केले. ते सकाळी अचानक रुग्णालयात येतात आणि प्रत्येक विभागाला भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची आणि कामाची पाहणी करतात. यामुळे सकाळी ९ ते दुपारी १२:३० आणि सायंकाळी ४:३० ते ५:३० या वेळेत रुग्णालयातील प्रत्येकाला ठरलेल्या वेळेत उपस्थित राहणे भाग पडले. इतकेच नाही तर, कामावर असताना मोबाइलचा अनावश्यक वापर टाळणे, कक्षांमध्ये रुग्णांची योग्य काळजी घेणे आणि स्वच्छतेकडे लक्ष देणे, यावरही विशेष भर दिला जात आहे. अधिष्ठाता मुंगल यांच्या अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात येत असल्यामुळे रुग्णालयातील बेशिस्त कर्मचारी आणि अधिकारी चांगलेच धास्तावले आहेत.