मराठा समाजाला आरक्षण द्या मात्र ओबीसींच्या आरक्षणातून नाही. निजामशाहीच्या पुराव्यांपर्यंत आम्ही मान्य केलं होतं. सध्या आमची माहिती अशी आहे की जिथे जुन्या नोंदी आहेत जिथे मराठा लिहिलं आहे तिथेही कुणबी लिहिण्याचा कार्यक्रम सुरु आहे. अशा प्रकारे सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं हे आम्हाला मुळीच मान्य नाही अशी भूमिका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी घेतली आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं.
ओबीसी समाजाला वेठीस धरणं अयोग्य
ओबीसी समाजाला वेठीस धरणं योग्य नाही. मंडल आयोग, कालेलकर आयोग यांनी कुठल्या जाती मागास आहेत याचं सर्वेक्षण केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानेही हे सांगितलं आहे की मराठा समाज मागास नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाचा पोपट मेला आहे. EWS चं आरक्षण घ्या किंवा वाढवून घ्या हाच त्यावरचा मार्ग आहे. तो मार्ग अंगिकारला तरच ओबीसी आणि मराठा संघर्ष थांबू शकेल.
तर आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल
३२ टक्के आरक्षण सांगितलं जातं आहे त्यात कोण आहे? कुणबी-मराठा, मराठा कुणबी, लेव्हा पाटील आहेत आणि मराठा आहेत. त्यातून यांना वजा केलं तर किती मराठा उरणार? सामोपचाराची भूमिका प्रत्येकाने घेणं आवश्यक आहे. सरकारने जर सरसकट मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट केलं तर आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल असाही इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
छगन भुजबळ यांनी जी भूमिका मांडली ती योग्यच आहे. ओबीसीचे नेते म्हणून ते आमच्या प्रश्नांसाठी लढत आहेत. तरीही त्यांना सरकारमधले काही मंत्री टार्गेट करत आहेत. मराठा समाजाकडूनही त्यांना टार्गेट केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचीच भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली आहे. असंही प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे.