शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभेत निवडणूक लढविण्यासाठी पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. नवनीत राणा यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी त्यांनी रणशिंग फुंकले होते. मात्र भाजपाने नवनीत राणा यांना प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर केली. दरम्यान आनंदराव अडसूळ यांचाही विरोध मावळला. उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार का घेतली? याचे उत्तर आता अडसूळ यांनी दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी फोन करून आपल्याला शब्द दिल्याचे त्यांनी सांगितले.

आनंदराव अडसूळ म्हणाले की, जागावाटपाची चर्चा सुरू असताना अमित शाह यांनी मला फोन केला होता. त्यांनी मला अमरावतीमधून निवडणूक लढवू नये, असे सांगितले. पण भाजपा जो उमेदवार देऊ इच्छितात त्यांचे निवडून येणे कठीण आहे. तसेच त्यांच्याविरोधात खटला प्रलंबित आहे, असे शाह यांना सांगितले. त्यावर ते म्हणाले की, आम्ही त्याची काळजी घेऊ. त्यानंतर त्यांनी मला राज्यपाल पद देण्यात येईल, अशी ऑफर दिली.

ध्रुव राठी आणि ‘आप’वर स्वाती मालिवाल यांचा मोठा आरोप; म्हणाल्या, “बलात्कार आणि जीवे मारण्याची..”

अमित शाह यांच्या ऑफरनंतर आनंदराव अडसूळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली. मात्र असेच आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २० महिन्यांपासून आपल्याला देत आहेत, अशीही आठवण करून दिली.

अडसूळ यांनी अमरावती लोकसभेचे २००९ आणि २०१४ साली प्रतिनिधित्व केले होते. २०१९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. नवनीत राणा यावेळी भाजपात गेल्या आहेत. अडसूळ यांनी शिवसेना शिंदे गटाकडून ही जागा लढविण्याचा प्रयत्न केला. मात्र नवनीत राणा यांनाच भाजपाने पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी आपला दावा सोडला.

मोदी सरकारची १० वर्षे; भारतीय अर्थव्यवस्थेनं नेमकं काय कमावलं अन् गमावलं?

नवनीत राणांचा विजय कठीण

अडसूळ यांनी नवनीत राणा यांचा यंदा विजय कठीण असल्याचेही भाकीत वर्तविले होते. ते म्हणाले, “मतदारसंघात नवनीत राणा यांच्या विरोधात वातावरण आहे. त्यामुळे त्या जिंकून येतील अशी माझ्या मनात शंका आहे. मागच्या पाच वर्षांत त्यांनी फक्त नाट्यमय घडामोडीतून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. जो लोकांना आवडलेला नाही. भाजपाचे कार्यकर्ते असोत किंवा सामान्य जनता नवनीत राणांची स्टंटबाजी कुणालाही आवडत नाही. तरीही त्यांना उमेदवारी दिली गेली.”

गजानन किर्तीकर यांनी महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ विधान केल्यानंतर त्यांच्या विधानाला आनंदराव अडसूळ यांनी पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली लढत दिली, असे विधान अडसूळ यांनी केले होते.