पुणे : करोनाच्या ओमायक्रॅान विषाणूचे नवे उत्परिवर्तन असलेल्या बीए.४ आणि बीए.५ चे रुग्ण आता महाराष्ट्रात आढळले आहेत. या प्रकारांचे एकूण सात रुग्ण पुणे शहरात आढळून आले आहेत. पुण्यातीस बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयाने सुरु असणाऱ्या जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने शनिवारी आपल्या दैनंदिन अहवालातून याबाबत माहिती दिली आहे. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर)  केलेल्या जनुकीय तपासणीत हे नवे प्रकार आढळले असून इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर (आयबीडीसी) फरिदाबाद या संस्थेने याची पुष्टी केली आहे.

विश्लेषण : करोना – आता चिंता बीए-४, बीए-५ ची?

राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॅा. प्रदीप आवटे म्हणाले, हे सर्व रुग्ण पुणे शहरातील आणि ४ मे ते १८ मे २०२२ या कालावधीतील आहेत. चार रुग्ण पुरुष तर तीन रुग्ण महिला आहेत. चार रुग्ण ५० वर्षांवरील वयोगटातील तर दोन रुग्ण २० ते ४० वर्ष वयोगटातील आहेत. एक रुग्ण दहा वर्षांखालील वयाचा आहे. दोन रुग्णांचा दक्षिण आफ्रिका आणि बेल्जियम प्रवास झाला आहे. तिघांनी भारतातच केरळ आणि कर्नाटक येथे प्रवास केला आहे. उर्वरित दोन रुग्णांनी प्रवास केलेला नाही. नऊ वर्ष वयाचा मुलगा सोडल्यास इतर सर्वांचे करोना लसीकरण पूर्ण झाले आहे. बीए.४ आणि बीए.५ हे ओमायक्रॉनचे प्रकार आहेत. या प्रकारच्या विषाणूचा प्रसाराचा वेग लक्षणीय असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील रुग्ण आलेखावरुन दिसून आल्याचे डॅा. आवटे यांनी स्पष्ट केले.

लक्षणे सौम्य तरी खबरदारी हवीच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्व रुग्णांना करोनाची सौम्य लक्षणे होती. कोणालाही रुग्णालयात भरती करण्याची गरज भासलेली नाही. प्रत्येकाला घरगुती विलगीकरणात उपचार देण्यात आले. आता हे सर्व रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत.