कराड : कराड तालुक्यातील शेणोली रेल्वे स्टेशनजवळील संजयनगर-गोपाळनगर येथे शनिवारी (दि. ५) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वनविभाग खात्याने कारवाई करीत घोरपड या वन्यप्राण्याच्या शिकारीच्या गुन्ह्यात एकाला गजाआड केले.

सुनील विजय जाधव ( रा. गोपाळनगर-शेणोली, ता. कराड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने घोरपड या वन्यप्राण्याची शिकार केली असल्याचे, तसेच सदर घोरपड स्वतःच्या घरी घेऊन येऊन शिजवून त्याचे खाद्यमांस केले असल्याची गोपनीय माहिती मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे यांना काल शनिवारी सायंकाळी मिळाली होती. त्यांनी ती माहिती तात्काळ वनक्षेत्रपाल तुषार नवले यांना दिली.

हेही वाचा – वाघाच्या शिकारीसाठी ‘वन्यजीव गुन्हे नियंत्रण’ विभागातील माहितीचा वापर? सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध!

हेही वाचा – अधिकाऱ्यांना तंबी देत गडकरी म्हणाले, “आता पाऊस आला की मीच रस्त्यावर..”

नवले, भाटे, वनपाल आनंद जगताप, वनरक्षक कैलास सानप, शंकर राठोड, मानसी निकम, पुजा परुले, वाहन चालक योगेश बडेकर, वनसेवक भरत पवार, अमोल माने यांच्या पथकाने शिताफीने शेणोली रेल्वे स्टेशन येथे रात्री कारवाई करीत सुनील जाधव यास ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आली आहे. घोरपड हे वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत शेडुल १ भाग १ मध्ये येते. त्याची शिकार करणे, हाताळणे कायद्याने प्रतिबंधित आहे. त्यासाठी ७ वर्षांपर्यंत कारावास व दहा हजार रुपयांपर्यंत दंड अशी कायद्यात तरतूद आहे.