नारायणगाव : कांद्यावर निर्यात शुल्क आकारणीचा केंद्र सरकारचा निर्णय हा एकप्रकारे अघोषित निर्यातबंदी असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मूळावर उठल्याचा आरोप खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मंगळवारी केला. विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळय़ासमोर ठेवून घेतलेला हा निर्णय दुर्दैवी असल्याची टीका करून राज्यात येणाऱ्या केंद्रीय नेत्यांच्या गळय़ात कांद्याची माळ घालण्याचा इशारा कोल्हे यांनी दिला. निर्यात शुल्क निर्णयाविरोधात आळेफाटा येथे शेतकऱ्यांनी सुमारे तासभर आंदोलन करून निषेध व्यक्त करीत निर्णयाची होळी केली. 

आळेफाटा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास खासदार अमोल कोल्हे यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर महाविकास आघाडी, शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी कांदा निर्यात शुल्क विरोधात आंदोलन केले. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, मंचर बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम, शिवसेना तालुकाध्यक्ष माउली खंडागळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक घोलप आदी कोल्हे म्हाणाले की, शेतमालाचे भाव वाढले की ते कमी करण्याचे धोरण केंद्र सरकार अवलंबते. यापेक्षा पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल व गॅस सिलिंडरचे दर कमी करावेत.  मंचर येथील कार्यक्रमात सहकारमंत्र्यांनी दरवाढीबद्दल चकार शब्दही काढला नाही, अशी टीका देवदत्त निकम यांनी केली. जिल्ह्यातील मंत्र्यांच्या गाडीवर कांदाफेक आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.