बहुतांश बाजार समित्या तीन दिवस बंद

जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर स्थिर असले तरी लासलगावसह इतर काही बाजार समित्या सलग तीन दिवस बंद राहणार असल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या पुरवठय़ावर होण्याची चिन्हे आहेत. शनिवारी नाशिक बाजार समितीत प्रति क्विंटलला सरासरी २२०० रुपये तर नामपूर बाजारात दोन हजार रुपये दर मिळाले.

देशांतर्गत मागणी वाढल्याने ऑगस्टच्या प्रारंभी कांद्याने दोन हजारांचा टप्पा ओलांडला. पुढील काळात हे दर आणखी उंचावण्याचा अंदाज आहे. दरवाढीचा लाभ घेण्यासाठी चाळीत साठविलेला कांदा शेतकरी बाहेर काढत आहेत. त्याचा परिणाम आवक वाढून दर काहिसे कमी होण्यात झाल्याचे पहावयास मिळाले. कांद्याची सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत शनिवारी लिलाव बंद होते. पुढील दोन दिवस सुटी असल्याने या बाजारात थेट मंगळवारी लिलाव होतील. नाशिक व नामपूर बाजार समितीत शनिवारी लिलाव झाले. नाशिक बाजार समितीत ५३८० क्विंटलची आवक होऊन त्यास किमान १८०० ते कमाल २६०० रुपये दर मिळाले. नामपूर बाजारात किमान ११०५ ते कमाल २७७५ दर मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. रक्षा बंधनानिमित्त सोमवारी इतर काही बाजार समित्या बंद राहणार आहेत. सलग तीन दिवसांच्या सुटीमुळे कांद्याची मागणी व पुरवठा यांच्या समीकरणावर काहीअंशी परिणाम होईल, असे चित्र आहे.