मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळणार नाही, ही गोष्ट मनोज जरांगे-पाटील यांना भेटल्यावरच सांगितलं होती. जरांगे-पाटलांच्या आंदोलनामागे कोण आहे का? हे येणाऱ्या काळात कळेल, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. याला जरांगे-पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सगळ्यांनी शोध घेतला आहे, तुम्हीही शोध घ्यावा, असं आव्हान जरांगे-पाटलांनी राज ठाकरेंना दिलं आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

“कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळणार नाही, ही गोष्ट जरांगे-पाटलांना भेटल्यावर सांगितली होती. मी आताही वेगळं काही सांगत नाही. जरांगे-पाटलांच्या आंदोलनामागे कोण आहे का? हे येणाऱ्या काळात कळेल. पण, आरक्षणामुळे जातीयवाद निर्माण करून राज्यातील कायदा-सुव्यवस्था भंग करायची कुणी ठरवली का? निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी सुरू झाल्या आहेत. मला हे सगळं चित्र सरळ दिसत नाही,” अशी शंका राज ठाकरेंनी उपस्थित केली होती.

हेही वाचा : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जाती-जातींमधला द्वेष वाढला, असंच होत राहिलं तर…”; राज ठाकरेंचा आरोप

“मराठा समाज कुणाचंही ऐकणार नाही”

यावर जरांगे-पाटील म्हणाले, “आमच्या पाठीमागे कोण आहे ते शोधून काढावं आणि सांगावं. सगळ्यांनी शोध घेतला आहे, तुम्हीही शोध घ्यावा. यापाठीमागे फक्त आणि फक्त मराठा समाज आहे. मराठा समाजातील मुलांचं कल्याण होत असल्यावर खोटे आरोप केले जातात. मराठा समाज कुणाचंही ऐकणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळवणार आहे.”

हेही वाचा : “मराठ्यांचा ७० वर्षे घात झाला, षडयंत्र रचून…”, ओबीसी नेत्यांचा उल्लेख करत जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

“लोकांचं लक्ष विचलित केलं जात आहे”

“या सगळ्यांमुळे मूळ मुद्दे भरकटवले जात आहेत. अन्यही महत्वाचे विषय आहेत. पण, वेगळ्या मुद्द्यांमध्ये गुंतवून ठेवलं जात आहे. ज्या गोष्टींमुळे जनता त्रस्त आहेत, ते विषय नागरिकांच्या डोक्यात येऊन नये म्हणून असा प्रयत्न केला जातोय. लोकांचं लक्ष विचलित केलं जातंय,” असेही राज ठाकरेंनी म्हटलं होतं.