Operation Sindoor India Airstrike: बुधवारी रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने भारतीय सशस्त्र दलांनी पीओके आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केले. भारतातील दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यात भूमिका बजावणाऱ्या जैश ए मोहम्मद आणि लष्कर-ए-तैय्यबा नेतृत्व संपवण्याच्या उद्देशाने भारतीय सैन्याने हल्ल्यांसाठी ही ठिकाणे निवडली.
दरम्यान भारताच्या या लष्करी कारवाईनंतर, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्याच्या कौस्तुभ गणबोटे यांच्या मुलाने प्रतिक्रिया देत, या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कौस्तुभ गणबोटे यांचा मुलगा कुणाल गणबोटे म्हणाले की, “आम्ही सर्वजण अशा कारवाईची वाट पाहत होतो आणि आम्हाला केंद्र सरकारकडून ही आशा होती. या कारवाईचे नाव “सिंदूर” आहे आणि मला वाटते की माझ्या आईसारख्या महिलांचा आदर करण्यासाठी हे नाव देण्यात आले आहे…”
ऑपरेशन सिंदूरवर कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाल्या, “सैन्यदलाने केलेली कारवाई योग्य आहे आणि त्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देऊन त्यांनी महिलांचा आदर केला आहे. आम्ही पंतप्रधान मोदी अशी कारवाई कधी करतील याची वाट पाहत होतो आणि त्यांनी त्यांना योग्य उत्तर दिले आहे. दहशतवाद्यांचा खात्मा केला पाहिजे.”
उरी सर्जिकल स्ट्राईकनंतर सर्वात मोठा हल्ला
भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी रात्री उशिरा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. हे हवाई हल्ले २०१९ मध्ये बालाकोटमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यानंतर आणि २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारताने केलेला सर्वात मोठा हवाई हल्ला होता.
पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले
दरम्यान ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर बॉम्ब टाकले आहेत, ज्यामुळे संपूर्ण पाकिस्तान हादरला आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारतीय हवाई दल आणि लष्कराचे ऑपरेशन होते. एकीकडे, आयएएफच्या लढाऊ विमानांनी हवाई हल्ले केले, तर दुसरीकडे, लष्कराने क्षेपणास्त्रांचा वापर देखील केला. भारतीय सैन्याच्या हल्ल्यांची ताकद इतकी प्रचंड होती की पाकिस्तानी हवाई दलाला भारतीय हवाई दलाने क्षेपणास्त्रे डागल्याचे लक्षातही आले नाही.