जालना : कुणाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यावी याचा शिष्टाचार आमच्या पक्षाने ठरविलेला आहे. ज्यांची विधाने गंभीरतेने घ्यावी वाटत नाहीत त्याच्यावर आम्ही प्रतिक्रिया देत नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सदर्भात येथे केले.

पडळकर यांनी धर्मांतर करणारांचे ‘सैराट’ करा असे वक्तव्य केले असून राष्ट्रवादी काँग्रेसने त्याचा साधा निषेधही का केला नाही, असा प्रश्न वार्ताहर बैठकीत विचारला तटकरे यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी वरील वक्तव्य केले. आपण पडळकरांना गंभीरतेने घेत नाही का? असा थेट प्रश्न विचारला असता तट‌करे म्हणाले त्याचे उत्तर आपण दिलेले आहे.

पडळकर यांनी वेळोवेळी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भात ते म्हणाले, एखाद्या विषयावर कुणाची वेगळी भूमिका असू शकते. परंतु ती व्यक्त करताना भाषा सभ्य आणि सुसंस्कृत असली पाहिजे. विधिमंडळ परिसरात झालेला राडा अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे. यासंदर्भात दोषी कितीही मोठा असला तरी कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणात जबाबदार असणाऱ्या आमदारांवर त्या-त्या पक्षांच्या नेत्यांनी कारवाई केली पाहिजे.

उध्दव ठाकरे यांनी महायुतीमध्ये येण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याच्या बाबतीत तटकरे म्हणाले , विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहातील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निवृत्त होत असल्याने घेण्यात आलेल्या कार्यक्रमातील ते वक्तव्य होते. त्यांच्या भाषणाचा सविस्तर अभ्यास केला तर ते हलके-फुलके असल्याचे दिसेल. ज्याच्यात कांही तथ्य नाही त्याबद्दल चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. उध्दव ठाकरे यांनीही फडणवीस यांच्या वक्तव्यावर दिलेली प्रतिक्रिया खेळीमेळीतील आहेत. त्यानंतर फडणवीस आणि ठाकरे यांच्या झालेल्या भेटीचा राजकीय अर्थ काढण्यात येऊ नये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकीय कारणांसाठी ते भेटले असतील असे वाटत नाही. राज्यातील विविध महामंडळावरील सदस्य नियुक्ती बाबत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या समन्वय समितीत चर्चा सुरु आहे. तीन नेत्यांकडे यासंदर्भात जबाबदारी दिली आहे. कोणत्या पक्षास कोणती महामंडळे आणि किती सदस्य देता येतील याचा आराखडा निश्चित करण्यात येत आहे. २०२६ मध्ये विधान परिषद सदस्यांच्या निवडीची वेळ येईल त्यावेळी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा राज्य पातळीवर विचार केला जाईल, असे तटकरे यांनी सांगितले.