सोलापूर : मुलीचे बापावर अगाध प्रेम असते. बाप जिवावर उठला, तरी ते प्रेम तसूभरही कमी होत नसते. त्याचा प्रत्यय आणून देणारी घटना पंढरपूरच्या न्यायालयात घडली.

घरच्या मंडळींचा विरोध झुगारून मुलीने परजातीय तरुणाशी प्रेमविवाह केल्यामुळे संतापलेल्या बापाने आपल्या घराण्याची इज्जत गेली म्हणून तिसऱ्याच दिवशी मुलीसह जावयाचा काटा काढण्याचा कट रचला. त्यानुसार तो पिस्तूल घेऊन एका मोटारीतून तडक निघाला होता. परंतु, रात्रगस्तीवरील पोलिसांना त्याच्या मोटारीत बेकायदा पिस्तूल सापडले. त्याच्यासह इतर दोघांना त्यांनी अटक केली. तपासादरम्यान, घरच्या मंडळींचा विरोध झुगारून पोटच्या मुलीने केलेल्या आंतरजातीय विवाहामुळे घराण्याची अब्रू गेली म्हणून संतापलेल्या बापाने ‘सैराट’ होऊन मुलीसह जावयाला खलास करण्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले.

अटकेनंतर बापासह अन्य दोघा साथीदारांनी जामिनावर सुटण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. परंतु बाप तुरुंगातून सुटून बाहेर आला, तर मुलगी आणि जावई यांच्या जीविताला धोका निर्माण होईल, असा आक्षेप सरकार पक्षाने घेतला होता. तब्बल दोन वेळा बापाचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. दरम्यान, या खटल्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर पुन्हा बापाने जामीन अर्ज दाखल केला असता, एव्हाना गरोदर झालेल्या मुलीचे मन द्रवले. तिने बापाला माफ करण्याचे मनापासून ठरविले. जावयानेदेखील साथ दिली. त्यासाठी न्यायालयात शपथपत्र दाखल केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बापाला माफ करावे, बापापासून मला आणि माझ्या नवऱ्याच्या जीविताला कोणताही धोका नाही. उलट, मी गरोदर असल्याने पित्याच्या आधाराची खरी गरज आहे. त्यामुळे बापाला जामिनावर सोडण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे तिने शपथपत्रात नमूद केले. परिणामी, तब्बल तीन महिन्यांनंतर बापाची तुरुंगातून सुटका झाली. या बहुचर्चित प्रकरणात बापातर्फे ज्येष्ठ फौजदारी वकील धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. सिद्धेश्वर खंडागळे, ॲड. सुहास कदम, ॲड. वैभव सुतार, ॲड. शिवप्रसाद ढोले काम पाहत आहेत.