पंढरपूर : कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा २ नोव्हेंबर रोजी पहाटे २.२० वाजता उपमुख्यमंत्री शिंदे आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

वारकरी संप्रदायात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वारीला अनन्यसाधारण महत्व आहे. यातील कार्तिकी वारीला मुंबई, कोकणासह परराज्यातून लाखो भाविक येतात. यंदा चांगला पाउस झाला आहे. त्यामुळे शेतकरी शेतीची कामे आटपून वारीला येणार असा अंदाज प्रशासनाचा आहे. या कार्तिकी वारीचा मुख्य दिवस म्हणजे एकादशी २ नोव्हेबर रोजी आहे. या एकादशीला शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने यातील कोणाला महापूजेसाठी निमंत्रित करावयाचे या बाबत विधी व न्याय विभागाला विचारणा केली होती.

यावर विधी व न्याय विभागाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करावे असे मंदिर समितीला कळवले आहे. त्यानुसार मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड.माधवी निगडे, अतुल शास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून महापूजेचे आमंत्रण दिल्याची माहिती औसेकर महाराज यांनी दिली.

कार्तिकी यात्रा कालावधीमधील वारकरी भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधांची तसेच यात्रा कालावधीत भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे याबाबत केलेल्या नियोजनाची माहिती या वेळी शिंदे यांना देण्यात आली. तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन – संवर्धन काम व दर्शन रांगेतील प्रस्तावित स्कायवॉक व दर्शन हॉल संबंधीची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी शिंदे यांना दिली. तसेच मंदिरातील इतर उपक्रमाची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला.