पंढरपूर : येथील विठ्ठलाचे टोकन दर्शन पास बोगस आढळल्याप्रकरणी हिंगोली जिल्ह्यातील सहा व्यक्तींना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. भाविकांनी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून बुकिंग करावे, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ व जलद दर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने १५ जूनपासून टोकन दर्शन प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यानुसार टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्या प्रणालीचे पास मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर बुकिंगची सोय आहे. त्याला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, २४ जून रोजी सकाळी ९ वाजता हिंगोली जिल्ह्यातील पार्वतीबाई बापूराव बेले, लक्ष्मीबाई केशवराव बळे, संध्या मारुतीराव सातपुते, अरुणा विठ्ठलराव सातपुते, सुधाकर रामचंद्र भालेराव व केशव गणपतराव हरबळे या व्यक्तींनी टोकन दर्शन प्रणालीद्वारे दर्शन बुकिंग केले. तसा पास त्यांना उपलब्ध झाला. तो घेऊन या सहा व्यक्ती टोकन दर्शन रांगेतील प्रवेशद्वारावर आले. या ठिकाणी त्यांच्या पासची तपासणी केली असता, ते बोगस असल्याचे सिद्ध झाले. याबाबत समितीने सर्वांची चौकशी केली. त्यामध्ये त्यांनी बोगस पास काढला असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्यावर पोलीस कारवाई सुरू आहे.

मंदिर समितीच्या वतीने आवाहन करण्यात येते, की टोकन दर्शन प्रणालीचे पास मंदिर समितीच्या http://www.vitthalrukminimandir.org या अधिकृत संकेतस्थळावरून नोंद करावेत. जेणेकरून फसवणूक होणार नाही. शिवाय, हा पास संपूर्णत: नि:शुल्क आहे, असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मंदिर दर्शनातील घुसखोरी थांबविण्यासाठी ही पद्धत योग्य आहे. तरीदेखील असे प्रकार घडत असतील, तर मंदिर समितीने कडक कारवाई करावी, अशी मागणी भाविकांतून होत आहे.