Pankaja Munde on Sandeep Kshirsagar : बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी १० हून अधिक आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मात्र, अद्याप कोणावरही कठोर कारवाई झालेली नाही. सध्या सीआयडी, विशेष चौकशी पथक आणि न्यायालयीन अशी तिहेरी चौकशी चालू आहे. अद्याप या चौकशीत कोणाच्या सहभागाबाबत ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडला पोलिसांनी ताब्यात घेतलं नाही. मात्र, विरोधी पक्षांमधील आमदारांनी वाल्मिक कराडप्रमाणेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही वेगवेगळे आरोप केले आहेत. विरोधी पक्षांमधील नेते मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मात्र, “कोणी मागणी केली म्हणून लगेचच राजीनामा घेतला जाणार नाही. पुरावे असल्याशिवाय कारवाई केली जाणार नाही”, असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा फेटाळून लावली.

वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. मुंडे यांच्या पाठिंब्याच्या जोरावरच वाल्मिकने संपूर्ण बीड जिल्ह्यात दहशत पसरवली असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. सत्ताधारी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी देखील हाच आरोप केला आहे. दुसऱ्या बाजूला, उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) प्रमुख अजित पवारांनी आतापर्यंत अनेक वेळा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे. मंगळवारी त्याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. यावर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी नाराजी व्यक्त करत एक्सवर एक पोस्ट केली आहे.

संदीप क्षीरसागर काय म्हणाले?

संदीप क्षीरसागर यांनी एक्सवर म्हटलं आहे की “वाल्मिक कराड जसा धनंजय मुंडेंचा खास आहे, तसे धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस व अजित पवारांचे खास आहेत. त्यामुळे राजीनामा अशक्य आहे. अंजली दमानिया यांनी कितीही पुरावे दिले तरी राजीनामा अशक्य आहे”. दरम्यान, क्षीरसागर यांच्या या पोस्टवर दमानिया यांनी देखील प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “आता अगदी स्पष्ट झाले आहे. यांना मित्राला वाचवायचे आहे. त्या मित्राने जनतेला चिरडले तरी चालेल”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंकजा मुंडे यांची दोन वाक्यात प्रतिक्रिया

दरम्यान, यावर आता पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांची मुंबईत काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठीकनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी वार्ताहरांनी त्यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आणि संदीप क्षीरसागर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या, “मी हे काहीच पाहत नाही. मी फक्त तुम्हा प्रसारमाध्यमांचं ऐकून घेते. मी यावर काय बोलू?”