पंकजा मुंडे यांचे महंतांना आवाहन; दसरा मेळाव्यात शक्तिप्रदर्शन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथींच्या कार्यक्रमांना अनेक गडांवर मी अध्यक्ष म्हणून जाते, पण कोणत्याही गडावर पंकजा मुंडेंच्या भाषणाला बंदी नाही. मग भगवानगडावरच भाषणबंदी का, असे थेट सवाल करून महंत नामदेव शास्त्री आपल्या निर्णयावर अडून बसल्याने संघर्ष नको म्हणून मध्य मार्ग काढत मेळावा कर्मभूमीतून जन्मभूमीत आणला. एका दिवसात मोठय़ा संख्येने राज्यभरातील लोकांनी हजेरी लावली. भगवानगडाच्या गादीबद्दल कधीही वाईट बोलणार नाही. लेकीचे सरकार असल्याने महंतांच्या केसालाही धक्का लागणार नाही. पण महंतांनी भगवानबाबांच्या आचार, विचाराला धक्का लागू देवू नये असे सांगत ‘त्या’ सर्वानी आपले पाण्यातील देव बाहेर काढावेत, असा टोला मंत्री पंकजा मुंडे यांनी लगावला. हा मेळावा माझा नाही तर मी जनतेच्या निर्णयाबरोबर असून सावरगाव घाट (ता.पाटोदा) येथे संत भगवानबाबा यांची पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचतानाची भव्य मूर्ती उभारून समाजातील वाईट चालीरीती आणि प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट (ता.पाटोदा) येथे संत भगवानबाबा यांच्या जन्मस्थळी पहिला दसरा मेळावा शनिवारी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झाला. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावरील दसरा मेळाव्यातून दीन दलित, उपेक्षित, वंचितांना ऊर्जा मिळत होती. दोन वर्षांपूर्वी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गडावरील मेळावा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मी त्यांना लाखो लोकांना हा निर्णय सांगावा, एकदम त्यांच्यावर परंपरा मोडून आघात करू नये अशी विनंती केली होती. मात्र, ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. यावेळी परवानगी नाकारल्यानंतर मेळावा कुठे घेणार, असा प्रश्न होता. संघर्ष नको म्हणून मध्य मार्ग काढून कर्मभूमीत नाही तर जन्मभूमी निवडली. दोन वर्षांत मी कधीही महंतांविरुद्ध बोलले नाही, बोलणारही नाही. पण भगवानगडाचे आज दर्शन घेता आले नाही, याच्या वेदना होत आहेत. हा मेळावा माझा नाही, जनतेचा आहे.

दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडे हेलिकॉफ्टरने येणार

महाराष्ट्रात शिवनेरीवरील जन्मोत्सवाला, चौंडीतील कार्यक्रमाला, महादेव जानकरांच्या कार्यक्रमाला, जय सेवालालच्या पोहरा येथील कार्यक्रमाला मी जाते. कोणत्याही गडावर माझ्या भाषणाला बंदी नाही. मग माझे काय चुकले, याचा विचार मी दोन वर्षांपासून करते आहे. पण याचे उत्तर मलाच सापडत नाही. राज्यभरातील फाटक्या, वंचित, उपेक्षित माणसाला मेळाव्यातून जगण्याची ऊर्जा मिळते. यासाठी लोकांच्या आग्रहास्तव हा मेळावा होत आहे. मी लोकांच्या निर्णयाबरोबर आहे. माझ्यापेक्षा समाजात चांगले नेतृत्व करणारा पुढे आला तर मी स्वतहून मागे जाईल, असा विश्वास त्यांनी दिला. भगवानगडावरील पोलिसांच्या गराडय़ाचा संदर्भ देत पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘लेकीचं सरकार आहे, महंतांच्या केसालाही धक्का लागणार नाही. पण महंतांनाही संत भगवानबाबांच्या आचार आणि विचारांना धक्का लागू देवू नये.’ गोपीनाथगडामार्फत समाजातील ४२ मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. सावरगाव घाट येथे संत भगवानबाबांची पाण्यावर तरंगणारी मूर्ती उभी करून या गावाचा कायापालट करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

पंकजा मुंडे गहिवरल्या 

गोपीनाथगडाच्या उद्घाटन कार्यक्रमात भाजपचे वरिष्ठ नेते असताना राज्यभरातील लोक आले होते. त्यावेळी महंत नामदेव शास्त्री यांनी आता भगवानगडाचा श्वास मोकळा झाला असे सांगत भाषणबंदीचा निर्णय जाहीर केला. आम्ही गडाचा श्वास गुदमरून ठेवला होता का, असा सवाल करून त्यानंतर भगवानगडावर गेल्यानंतरही महंतांनी अपमानास्पद वागणूक दिली याची आठवण सांगत त्या गहिवरल्या.

खासदार प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथगड ते सावरगाव घाट अशी रथ यात्रा काढली. गावातील लोकांनी गुढय़ा उभारून दसरा मेळाव्याचे स्वागत केले. सावरगावकडे जाणारे सर्व रस्ते गाडय़ांच्या वाहतूक कोंडी झाली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde speech at savargaon ghat on dussehra
First published on: 01-10-2017 at 01:20 IST