बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठी डावलल्यानंतर समर्थकांनी थेट रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. राज्यभर संतापाची लाट उसळल्यानंतर आता त्यांच्या समर्थकांकडून ‘होय, आम्ही नाराज आहोत, प्रदेश भाजपकडून डावलले जात आहे, अशा आशयाची एक लाख पत्रे आणि दहा लाख ई-मेल अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या सर्व प्रकरणात पंकजा मुंडे यांनी भाष्य केलेले नाही. या पार्श्वभूमीवर  २१ जून रोजी पंकजा मुंडे पाथर्डीत मोहटादेवीच्या दर्शनाला येत आहेत. तेथे पंकजा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नेमकी काय भूमिका घेतात? याकडे लक्ष असून समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यासाठी समाजमाध्यमातून मोहीमच चालवली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंकजा मुंडे यांनी गोपीनाथगडावरील कार्यक्रमात संधी मिळाली तर सोने करू. आपण विधान परिषदेवर जावे ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे सांगत अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र पंधरा दिवसांपूर्वी भाजपने विधान परिषदेवर पंकजा यांना संधी नाकारल्यानंतर समर्थकांनी समाजमाध्यमातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य करत टीकेची झोड उठवली. पंकजा यांनी उमेदवारी जाहीर झालेल्यांचे अभिनंदन किंवा समर्थकांना कोणताच संदेश दिलेला नाही. तर समर्थकांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना रस्त्यावर अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. औरंगाबाद शहरात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. जालन्यात आत्मक्लेश आंदोलन तर पाथर्डीत एका कार्यकर्त्यांने विष घेण्याचा प्रयत्न केला. पक्षाच्या नेत्यांनी माध्यमांसमोर पंकजा मुंडे मोठय़ा नेत्या आहेत, त्या नाराज नाहीत, असे सांगत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला; पण अंतर्गत गटबाजी थेट रस्त्यावर आली.  पक्षांतर्गत रणकंदानंतर पंधरा दिवसांनी पंकजा थेट मैदानात उतरणार असल्याने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी समर्थकांनी केली आहे. आष्टी येथेही पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्या बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.