परभणी : जिंतूर तालुक्यातील भांबरी येथे विनापरवाना आणि संशयित पद्धतीने कापसाच्या एच. टी. बी. टी. बियाण्यांची विक्री होत असल्याच्या माहितीवरून कृषि विभागाने भांबरी येथील मारोतीराव बापूराव भोंबे या विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भांबरी येथील मारोतीराव बापूराव भोंबे याच्या घरी ‘वरद सीएच १०१’ नावाचे संशयित बियाण्यांची ३ हजार ६०४ रुपये किंमतीची चार पाकिटे आढळून आली. संबंधित बियाण्यावर कंपनीचे नाव, उत्पादन तारीख, चाचणी तारीख, वैधता कालावधी यांसारख्या कोणत्याही अधिकृत माहितीचा उल्लेख नसल्यामुळे हे बियाणे अनधिकृत व संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले. घरातील झडतीदरम्यान चौकशीअंती भोंबे यांनी ते नारायण वैद्य (रा. वडगाव, ता. मंठा) यांच्याकडून विक्रीसाठी मिळाले असल्याचे सांगितले. मात्र, कारवाई दरम्यान आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी बियाणे चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विकास अधिकारी दीपक समाले, कृषि अधिकारी शिवाजी बापूराव वावधने, विस्तार अधिकारी के. डी. सरकटे, पोलीस कर्मचारी आणि पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामात अधिकृत व मान्यताप्राप्त विक्रेत्यांकडूनच बियाणे आणि खते खरेदी करावीत. कुठेही विनापरवाना, अनधिकृत बियाणे व खते विक्री होत असल्यास त्याची तातडीने माहिती कृषि विभागास द्यावी, असे आवाहन कृषि विकास अधिकारी दीपक समाले यांनी केले आहे.