परभणी : शहरातील जिंतूर रस्त्यावरील ठाकरे कमान परिसरात विशाल आर्वीकर (वय ३२) या तरुणाचा भर रस्त्यात चौघांनी धारदार शस्त्रांनी खून केल्याची घटना शुक्रवारी (दि. ९) रात्री घडली. आज सकाळी शहरात या घटनेचे वृत्त सर्वत्र पसरले. या खून प्रकरणातील दोन संशयित आरोपींना नानल पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेमागील नेमके कारण काय या संदर्भात पोलिसांनी तपास चालवला आहे.

विशाल आर्वीकर हा तरुण शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शहरातील जिंतूर रस्त्यावरील बाळासाहेब ठाकरे कमान परिसरात आपल्या परिचितांशी बोलत थांबला होता. एवढ्यात तोंडाला कपडा बांधलेले चार जण मोटरसायकलवर तिथे आले. या सर्वांच्या हातात धारदार शस्त्रे होती. त्यांनी विशालवर धारदार शस्त्र आणि हातोड्याने सपासप वार करत त्याला जमिनीवर पाडले. विशाल खाली कोसळल्यानंतर चारही आरोपींनी आपापल्या मोटरसायकलवर घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेचे वृत्त परिसरात कळाल्यानंतर त्या ठिकाणी आसपासच्या वसाहतींमधील नागरिकांचा जमाव गोळा झाला. विशाल आर्वीकर यास तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले. मात्र त्याच्यावरचा हल्ला प्राणघातक असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी वर्षा गिराम यांच्या फिर्यादीवरून नानल पेठ पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विकी पाष्टे, गोविंद ऊर्फ गोपाल पाष्टे, शुभम पाष्टे, तुषार सावंत या चौघांविरुद्ध हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, काल रात्री घटनेनंतर पसार झालेल्या चौघांपैकी दोन संशयितांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी दिनकर डंबाळे, पोलीस निरीक्षक कामठेवाड यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक खज्जे हे करीत आहेत.