परभणी : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील खरिपाची पेरणी धोक्यात आली असून पावसाने आणखी ताण दिल्याने दुबार पेरणीचे संकट समोर असल्याच्या धास्तीने शेतकरी सध्या अस्वस्थ आहेत. परभणी जिल्ह्यात खरीप हंगामाखालील क्षेत्र हे साडेपाच लाख हेक्टरचे आहे. कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातल्या ८५ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाल्याचे सांगितले जात असले तरी बहुतांश भागात पेरणी झाली असून पेरणी न झालेले क्षेत्र अत्यंत नगण्य आहे.
पेरणी झाल्यानंतर कापूस, सोयाबीन ही दोन्ही पिके वाढीला लागण्याची वेळ आलेली असताना नेमका पावसाने हात आखडता घेतल्याने सध्या ग्रामीण भागात अस्वस्थता पाहायला मिळत आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने पिकांची वाढ तर खुंटलीच पण पावसाअभावी आता कोवळी पिके कोमेजून जात आहेत.
जुलै महिना अर्धा संपलेला असताना जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण निम्मे आहे. गतवर्षी १५ जुलैपर्यंत सरासरी २४५ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली होती. पावसाची ५० टक्के तूट झालेली असल्याने पिके जगणार कशी या प्रश्नाने सध्या शेतकरी धास्तावला आहे. पावसासाठी शेतकऱ्यांचे डोळे आसुसलेले असले तरी अजूनही जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कुठेच पाऊस झालेला नाही. पाऊस नसल्याने सर्व पिके खुंटलेली आहेत. जिल्ह्यात सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या येलदरी व दुधना या दोन्ही प्रकल्पांची स्थिती फारशी समाधानकारक नाही. येलदरी धरणात ५२ टक्के तर निम्न दुधना प्रकल्पात ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
गतवर्षी कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकांनी शेतकऱ्यांची निराशा केलेली असताना यंदा पुन्हा कापसाखालील क्षेत्र वाढलेले आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना नगदी पीक म्हणून या दोन्ही पिकाशिवाय अन्य पर्याय नसल्याने या दोन पिकांखाली खरिपाचे सर्वाधिक क्षेत्र आहे. गतवर्षी कापसालाही वाढीव भाव मिळाला नाही आणि सोयाबीन तर किमान आधारभूत किमती पेक्षाही कमी भावाने शेतकऱ्यांना विकावे लागले. अशास्थितीत गतवर्षीचा अनुभव समाधानकारक नसताना यंदा पावसाअभावी पुन्हा दुबार पेरणीच्या संकटाची भीती शेतकऱ्यांना जाणवू लागली आहे. येत्या दोन-तीन दिवसात जर समाधानकारक पाऊस झाला नाही तर जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट आणखी गडद होणार आहे